बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आजतागायत भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये कधी बघण्यात आलेली नाही. मात्र, उत्तर प्रदेशातल्या बदायू जिल्ह्यातल्या कुंवरगावजवळच्या दुगरैय्या येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली होती. तो पुतळा निळ्या रंगाचा होता. आता त्याजागी नवा पुतळा बसवण्यात आला असून अंगातला कोट भगव्या रंगाचा आहे. विशेष म्हणजे बहुजन समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांसह बाबासाहेबांच्या अन्य अनुयायांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण झाले असून कुणीही आक्षेप घेतलेला नाही, उलट सगळ्यांनी पुतळ्यासह स्वत:चे फोटो काढून घेतले आहेत.

न्यूज18 ने दिलेल्या वृत्तानुसार दलित समाजातील लोकांबरोबरच पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रविवारी पार पडला. बाबासाहेबांची प्रतिमा निऴ्या रंगाच्या ऐवजी भगव्या रंगात दाखवण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही समाजकंटकांनी काही दिवसांपूर्वी बाबासाहेबांच्या पुतळ्याची तोडफोड केली होती. जिल्ह्यातल्या तंग वातावरणाचा अंदाज आल्याने जिल्हा प्रशासनाने तातडीनं नवीन पुतळा मागवला. रविवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण करण्याक आले.

यावेळी बसपाचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र गौतम यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी जोशामध्ये पुतळ्याला पुश्पहार वाहिले. गेल्या काही दिवसांमध्ये 10 पेक्षा जास्त ठिकाणी आंबेडकरांच्या मूर्तीची विटंबना करण्याचे प्रकार घडले आहेत. आत्तापर्यंत गुन्हे दाखल होऊनही कुणाला अटक झालेली नाही. त्याच सुमारास उत्तर प्रदेश सरकारने बाबासाहेबांच्या नावात वडिलांचे रामजी हे नाव समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांच्या पुतळ्यांवर निळ्या ऐवजी भगवा रंग चढल्यामुळे बाबासाहेबांचे भगवेकरण करण्यात येत असल्याची शंका व्यक्त होत आहे.