“शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख…”; पंतप्रधान मोदींनी बाबासाहेब पुरंदरेंना वाहिली भावनिक श्रद्धांजली

याच वर्षी २९ जुलै रोजी बाबासाहेब पुरंदरेंनी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं तेव्हा मोदींनी त्यांना मराठीमध्ये खास शुभेच्छा दिलेल्या.

Babasaheb purandare death PM Modi Paid Tribute
मोदींनी ट्विटरवरुन व्यक्त केल्या भावना

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं आज वयाच्या १०० व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झालं. १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांच्या निधनाचं वृत्त समोर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मोदींनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन बाबासाहेबांच्या भेटीदरम्यानचा फोटो ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी बाबासाहेबांच्या निधनामुळे कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. “शब्दांमध्ये मांडता येणार नाही असं दु:ख मला झालं आहे. बाबासाहेब पुरंदरेच्या निधनामुळे इतिहास आणि संस्कृतिक क्षेत्रामध्ये कधीही न भरुन येणारी पोकळी निर्माण झालीय. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भविष्यातील पिढ्या छत्रपती शिवाजी महारांजांशी जोडलेल्या राहतील. त्यांनी केलेलं इतर कामही कायमच स्मरणात राहील,” असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: १०० व्या वाढदिवशी बाबासाहेब पुरंदरे म्हणालेले, “आयुष्याची आणखी २-३ वर्षे मिळाली तर एवढीच इच्छा आहे की…”

‘राजा शिवछत्रपती’ या ग्रंथाचे लेखक, ‘जाणता राजा’ या महानाटय़ाचे लेखक-दिग्दर्शक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी याच वर्षी २९ जुलै रोजी वयाच्या १०० व्या वर्षात पदार्पण केलं होतं. त्यावेळी आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती दर्शवली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ संदेशाच्या माध्यमातून मराठीमधून शुभेच्छा दिल्या होत्या.

नक्की वाचा >> बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन : गडकरी हळहळले तर नारायण राणे म्हणाले, “ही महाराष्ट्राची खूप मोठी हानी”

“शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना मी सुरुवातीलाच साष्टांग नमस्कार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आदर्श उभे केले आहेत, जी शिकवण दिली आहे, तिचं आचरण करण्याची शक्ती परमेश्वराने मला द्यावी अशी प्रार्थना मी देवाकडे करतो”, अशा मराठीतून शुभेच्छा देत मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. “२०१९ मध्ये देशानं त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केलं होतं. २०१५ मध्ये तत्कालीन महाराष्ट्र सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला होता. मध्य प्रदेशमध्येही शिवराजसिंह चौहान सरकारने देखील बाबासाहेब पुरंदरेंना कालिदास पुरस्काराने सन्मानित केलं होतं. शिवाजी महाराजांबद्दल बाबासाहेब पुरंदरेंची इतकी भक्ती उगीच नाही. शिवाजी महाराज भारताच्या इतिहासाचे शिखर पुरुष आहेतच. पण भारताचा वर्तमान आणि भूगोलही त्यांच्या अमर गाथांनी प्रभावित आहे”, असं देखील मोदींनी यावेळी नमूद केलं होतं.

“शिवाजी महाराजांची अनेक कामं आजही अनुकरणीय आहेत. बाबासाहेब पुरंदरेंनीच स्वतंत्र भारतातील नव्या पिढीला शिवाजी महाराजांचं आयुष्य सांगण्याचं काम केलं आहे. त्यांच्या लेखांमध्ये आणि पुस्तकांमध्ये शिवाजी महाराजांबद्दल त्यांची अतूट श्रद्धा दिसून येते. बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांचं आयुष्य, त्यांचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यात जे योगदान दिलंय, त्यासाठी आम्ही त्यांचे ऋणी आहोत”, असं देखील मोदी म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Babasaheb purandare death pm modi paid tribute scsg

Next Story
बराक ओबामा यांची रोम्नींवर टीका
ताज्या बातम्या