बाबरी मशीद विध्वंसाला आज २९ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मथुरेत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. अखिल भारत हिंदू महासभेने शाही इदगाह मशिदीच्या आत असलेल्या जन्मस्थानी भगवान कृष्णाची मूर्ती स्थापित करण्याची परवानगी मागितल्यानंतर मथुरामध्ये मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

“आम्ही जवळपास ३,००० सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. शहरात आज होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, याची आम्हाला खात्री देण्यात आली आहे. परंतु आम्ही कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असून परिसर सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करू,” असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोव्हर यांनी सांगितले. मशिदीकडे जाणाऱ्या रस्त्यांना जास्तीत जास्त सुरक्षा पुरविण्यात आली असून, आज स्थानिक लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात येणार आहेत. तणावपूर्ण परिस्थितीमुळे पोलिसांनी प्रवासी सूचना जारी केल्या असून सात मार्गांवर प्रवास करण्यास मनाई केली आहे. दींग गेट आणि मंदिर परिसरात वाहतूक वळवण्यात आली आहेत.

सोशल मीडियावर बाबरी मशीद ट्रेंड…

बाबरी मशीद विध्वंसाची २९ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोशल मीडियावर विविध हॅशटॅग चालवले जात आहेत. #6DecemberBlackDay, Babri Masjid, बाबरी मस्जिद इत्यादी हॅशटॅग ट्रेंड होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे, बाबरी मशीद विध्वंसाला शौर्याची कामगिरी संबोधत ट्विटरवर #shauryadivas देखील ट्रेंड होत आहे.  

हेही वाचा – Timeline: राम मंदिर-बाबरी मशीद वादाचा इतिहास, जाणून घ्या नक्की काय घडलं होतं