बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला २९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळेस बोलताना तोगडिया यांनी अप्रत्यक्षपणे केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारवर निशाणा साधला. रामराज्याचा विसर सत्ताधाऱ्यांना पडल्याचा टोला तोगडीया यांनी लगावलाय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नक्की वाचा >> “राम मंदिराच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारने बाळासाहेबांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन ऋणमुक्त व्हावं”

तर आंदोलन रामराज्याच्या दिशेने चाललंय असं म्हणू…
“प्रभू राम झोपडीतून महालात आले याचा आनंद आहे. पण देशातील एक कोटी बेघर हिंदूंना घर मिळेल तेव्हा मी म्हणू शकेल की रामराज्य येत आहे,” असं तोगडीया म्हणालेत. तसेच पुढे बोलताना, राम मंदिर दिसत आहे पण रामराज्य कुठे आहे? १ कोटी बेघर, १९ कोटी उपाशी, शेतकऱ्यांवर कोट्यावधींचं कर्ज आहे, असं म्हणत तोगडीया यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केलं आहे. “एक कोटी बेघर हिंदूंना घर मिळेल तेव्हा राम मंदिर आंदोलन रामराज्याच्या दिशेने वाटचाल करत असं आम्ही म्हणू,” असंही तोगडीया यावेळी म्हणाले आहेत.

विसर पडू नये अशी इच्छा…
राम मंदिराच्या नावाने काही लोकांना सत्ता मिळाली ही चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी रामराज्य विसरु नये. ते कदाचित विसरले आहेत. पण आणखी विसर पडू नये अशी इच्छा व्यक्त करतो, असं तोगडीया पत्रकार परिषद संपताना म्हणालेत.

आम्हाला गर्व आहे की…
तोगडीया यांनी राम मंदिर आंदोलनासंदर्भात बोलताना बाबरी पाडल्याचा गर्व आहे असंही म्हटलंय. “आपला जन्मही झाला नव्हता तेव्हापासून हिंदू लढत होते. शौर्य दाखवत होते. संघर्ष करत होते. त्यापैकी ६ डिसेंबरचं शौर्य हे तीन मुद्द्यांसाठी अद्वितीय आहे. आम्हाला गर्व बाबरी पाडण्यावर. जिथे एकेकाळी मशीद होती तिथे मंदिर उभारलं याचा आम्हाला गर्व आहे. मी यामध्ये माझ्या आयुष्याची ३२ वर्षे, डॉक्टरकीचा पेशा आणि त्यामधून मिळाला असते असे कोट्यावधी रुपये मी या कामासाठी सोडून दिल्याचा मला गर्व आणि आनंद आहे. माझ्यासारख्या लाखो कार्यकर्त्यांनी करियर, पैसे बनवण्यासाठी जाण्याऐवजी रामाच्या जन्मभूमीमध्ये मंदिर बनवण्यासाठी पुढे आले याचा मला गर्व आहे,” असं तोगडीया म्हणालेत.

ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी प्राप्त करावी
“चार लोकांचं नेतृत्व नसतं तर बाबरी पडली नसती आणि मंदिर उभं राहिलं नसतं. यापैकी पहिले आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दुसरे आहेत अशोक सिंघल. तिसरे योगी आदित्यनाथ यांचे गुरु गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी. चौथे होते अयोध्येचे रामचंद्र परमहंस,” असं तोगडीया यांनी सांगितलं. “या चौघांसोबत माझं खास नातं आहे. या चौघांना जोपर्यंत भारतरत्न मिळत नाही तोपर्यंत मी म्हणेल की भारत सरकारने राम मंदिर आंदोलनाचा सन्मान केलेला नाही. या चौघांनाही भारतरत्न जाहीर करा आणि ज्या राम मंदिराच्या नावावर सत्ते आला आहात त्याची ऋणमुक्ती सत्तेत असलेल्यांनी प्राप्त करावी,” असं तोगडीयांना म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Babri masjid demolition praveen togadia asks bjp lead government ram mandir is there but where is ram rajya scsg
First published on: 06-12-2021 at 15:28 IST