पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रेजीनगर येथे अयोध्येतील बाबरी मशिदीच्या धर्तीवर बनवलेल्या मशिदीची पायाभरणी शनिवारी तृणमूल काँग्रेसचे निलंबित आमदार हुमायून कबीर यांनी केली. यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तप्त झाले आहे. व्यासपीठावर सौदी अरेबियातील धार्मिक नेतेदेखील उपस्थित होते.

पोलीस, आरएएफ आणि केंद्रीय दलांच्या बंदोबस्तात कबीर यांनी रेजीनगरमधील एका मोठ्या व्यासपीठावर फीत कापून समारंभाची सुरुवात केली. या वेळी ‘नारा-ए-तकबीर, अल्लाहू अकबर’ चा जयघोष करण्यात आला. हजारो लोक येथे उपस्थित होते. कुराणातील वचने लाऊडस्पीकरवरून सुरू होती. अनेकांनी प्रतीकात्मक विटाही आणल्या होत्या.

दरम्यान, या संकुलात एक रुग्णालय, एक वैद्याकीय महाविद्यालय, एक विद्यापीठ, एक हॉटेल आणि एक हेलिपॅडदेखील असेल, ज्याची एकूण गुंतवणूक अंदाजे ३०० कोटी रुपये असेल असे कबीर म्हणाले.

एका स्थानिक डॉक्टरने या प्रकल्पासाठी आधीच १ कोटी रुपये देणगी दिली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.

विरोधी पक्षांची टीका

या घटनेवर सर्व पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पुढील वर्षी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूल काँग्रेसने गुप्तपणे ध्रुवीकरणाला प्रोत्साहन दिल्याचा आरोप भाजपने केला, तर सत्ताधारी पक्षाने कबीरच्या कृतींपासून स्वत:ला दूर ठेवले आणि त्यांचे निलंबन हे त्यांच्या राजकारणाला पाठिंबा देत नसल्याचे पुरावे असल्याचे म्हटले.

देशात अंदाजे ४० कोटी मुस्लीम आहेत आणि या राज्यात चार कोटी आहेत. आपण येथे मशीद बांधू शकत नाही का? असंवैधानिक काहीही करत नाही. प्रार्थनास्थळ बांधणे हा घटनात्मक अधिकार आहे. बाबरी मशीद बांधली जाईल. मुख्य मशीद तीन ‘कठ्ठा’ (एकर) जमिनीवर बांधली जाईल, तर संपूर्ण संकुल सुमारे २५ बिघा क्षेत्रफळ परिसरात असेल. – हुमायून कबीर, आमदार