पीटीआय, कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष गोतबया राजपक्षे शुक्रवारी थायलंडहून श्रीलंकेत कोलंबो येथे परतले.  श्रीलंकेतील बिकट आर्थिक पेचप्रसंगांमुळे त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी श्रीलंकेत उग्र निदर्शने, हिंसक आंदोलने सुरू होती. त्या पार्श्वभूमीवर राजपक्षे देश सोडून गेले होते. ते ५१ दिवसांनी श्रीलंकेत परतले आहेत. राजपक्षे शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानाने कोलंबोत परतले. राजपक्षे यांच्या सत्ताधारी श्रीलंका पोदुजना पेरमुना पक्षाच्या (एसएलपीपी) संसदसदस्यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले.

१३ जुलै रोजी हवाई दलाच्या विमानाने ते पत्नी आणि दोन अंगरक्षकांसह मालदीवला रवाना झाले. त्यानंतर ते सिंगापूरला गेले व तेथून त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा पाठवला होता. सिंगापूरहून दोन आठवडय़ानंतर राजपक्षे थायलंडला गेले होते व तेथे तात्पुरत्या व्हिसावर त्यांचा बँकॉकला मुक्काम होता. येथील ‘डेली मिरर’ने दिलेल्या वृत्तानुसार राजपक्षे कोलंबोतील विझेरामा मवाथा भागातील सरकारी बंगल्यात राहणार आहेत. त्यांच्यासाठी कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवली आहे.

पुन्हा राजकारणात सक्रिय?

‘एसएलपीपी’च्या सूत्रांनी ‘इकोनॉमी नेक्स्ट’ संकेतस्थळाला सांगितले, की राजपक्षे यांनी राजकारणात सक्रिय व्हावे, असे त्यांच्या पक्षांच्या अनेकांचे मत आहे. मात्र, ते आता राजकीय क्षेत्रात सक्रिय राहणार नाहीत. मात्र, राजपक्षेंच्याच पक्षाच्या अनेक वरिष्ठ सहकाऱ्यांना राजपक्षे यांनी पुन्हा राजकीयदृष्टय़ा सक्रिय व्हावे, असे वाटत नाही. त्यांना पुन्हा नेतेपदी पाहण्याची अनेकांची इच्छा नाही. मात्र, राजपक्षेंनी कोणताही गुन्हा केला नसल्याने त्यांना मायदेशी परतून माजी अध्यक्षांना प्रदान केलेले सर्व अधिकार उपभोगण्याचा अधिकार आहे, असेही या सूत्रांनी सांगितले.