उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला भगवा रंग दिल्यामुळे मोठा टीकेला सामोरे जावे लागल्यानंतर आता पुन्हा एकदा या पुतळ्याला निळा रंग देऊन वाद शमवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बदायूंमधील बसपाचे नेते हेमेंद्र गौतम यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुन्हा एकदा निळा रंग दिला आहे. बदायूंमधील कुवरगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दुगरेय्या गावात शनिवारी सकाळी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी नवा पुतळा बसवण्यात आला. पण या पुतळ्याला भगवा रंग देण्यात आला होता. इतकेच नव्हे तर नेहमी कोट परिधान केलेल्या पुतळ्याऐवजी शेरवानी पोशाख असलेला पुतळा बसवण्यात आला होता.

विशेष म्हणजे या पुतळ्याच्या लोकार्पणावेळी माजी जिल्हाध्यक्ष क्रांतिकुमार आणि पोलीस उपअधीक्षक वीरेंद्र यादव यांच्याबरोबर बसपाचे जिल्हाध्यक्ष हेमेंद्र गौतम हेही उपस्थित होते. परंतु, टीकेचा सामना करावा लागल्यानंतर हेमेंद्र गौतम यांनी त्वरीत पुतळ्याला निळा रंग दिला.

‘रामजी’ पाठोपाठ बाबासाहेब आंबेडकरांचा पोशाख झाला भगवा

पुतळ्याचा रंग बदलल्यानंतर अनेक दलित संघटनांनी आक्षेप नोंदवत रंग बदलण्याची मागणी केली होती. उत्तर प्रदेशमध्ये सध्या बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून राजकारण तापले आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची प्रकरणे समोर आली होती. त्यानंतर राज्य सरकारने बी आर आंबेडकर ऐवजी भीमराव रामजी आंबेडकर असे पूर्ण नाव लिहिण्याच्या सूचना केली होती. त्यानंतर आता पुतळ्याचा रंगच बदलण्यात आल्याने राज्यात मोठा हल्लकल्लोळ उठला आहे.