Maithili Thakur : बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून थोड्या वेळात बिहारच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. मात्र, दुपारपर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार बिहारमध्ये एनडीए आघाडीवर असून एडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये एनडीचं सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत.

बिहारच्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली होती ती म्हणजे लोकप्रिय गायिका मैथिली ठाकूर यांची. मैथिली ठाकूर या आघाडीवर असून विजयाच्या जवळ आहेत. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल. मात्र, बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए सरकार स्थापन होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना मैथिली ठाकूर यांनी एनडीएला शुभेच्छा देत शुभेच्छा गीत गायलं आहे.

‘बधैया बाजे आँगने में…’, हे गीत मैथिली ठाकूर यांनी पीटीआयशी बोलताना गायलं आणि शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या दमदार कामगिरीचं श्रेय मैथिली ठाकूर यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना दिलं आहे. एनडीएने जवळपास २०० जगांवर आघाडी घेतलेली आहे. अद्याप राज्यभर मतमोजणी सुरू असून थोड्याच वेळात निकाल जाहीर होईल.

विजय मिळवल्यास पहिला निर्णय काय घेणार?

निवडणुकीत विजय मिळवल्यास तुम्ही आमदार म्हणून पहिला निर्णय काय घेणार असा प्रश्न मैथिली यांना विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, ‘आमदार म्हणून हा माझा पहिला कार्यकाळ असेल. मी माझ्या मतदारसंघातील लोकांची मुलगी म्हणून सेवा करेन. मला खूप आनंद आहे की लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे. हा फक्त माझा विजय नसेल तर जनतेचा विजय असेल”, असं मैथिली यांनी म्हटलं.

“गायनाचा छंद सोडणार नाही’

“बऱ्याचदा सरकारी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामागे वेगवेगळी कारणे असतात. या योजनांना मी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करेन. निवडणुकीच्या प्रचारावेळी मला अलीनगर मतदारसंघात बऱ्याच समस्या दिसून आल्या होत्या. त्याची मी डायरीत नोंद करून ठेवली असून लवकरात लवकर या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करेन. पुढील पाच वर्षांत मी माझ्या मतदारसंघाचा विकासाच्या माध्यमातून कायपालट करणार आहे. राजकारणात प्रवेश केला असला तरी मी माझा गायनाचा छंद सोडणार नाही. त्यासाठी मी दररोज एक तास लवकर उठेन आणि रात्री उशिरा झोपणारठ, असेही मैथिली यांनी स्पष्ट केले आहे.