अयोध्येतील राम मंदिर दानामध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप ताजे असतानाच, आता उत्तराखंडमधील प्रसिद्ध बद्रीनाथ धामातही असाच प्रकार घडल्याचा संशय समोर आला आहे. बद्रीनाथ मंदिरात भाविकांनी अर्पण केलेल्या देणगीमध्ये गैरव्यवहार झाल्याचे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, ‘बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीने’ या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मंदिर समितीचे अध्यक्ष काय म्हणाले?
बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, सोशल मीडियावर फिरणाऱ्या या आरोपांची समितीने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे. तसेच, ज्या कर्मचाऱ्यांवर संशय व्यक्त केला जात आहे, त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे.
यासोबतच, सोशल मीडियावरील एका दाव्याचे खंडन करताना द्विवेदी यांनी स्पष्ट केले की, ज्या कर्मचाऱ्याचे नाव या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून घेतले जात आहे, तो त्यांचा ‘वैयक्तिक सचिव’ नाही. तो मंदिर समितीचा एक नियमित सरकारी कर्मचारी आहे. जर तपासात हे आरोप खरे ठरले, तर कोणत्याही दोषीला पाठीशी घातले जाणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास त्यांनी दिला.
सीसीटीव्ही फुटेज आणि पुराव्यांच्या आधारे तपासमंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रंगड यांनी सांगितले की, चौकशी समिती सर्व उपलब्ध पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवून आपला अहवाल सादर करेल. जर तपासादरम्यान कोणताही गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळून आली, तर ‘श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समिती कायदा, १९३९’ आणि कर्मचारी आचारसंहितेनुसार दोषींवर कडक कायदेशीर व विभागीय कारवाई केली जाईल.
अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांमधील गैरव्यवहार आणि देणगी चोरी प्रकरणाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. अयोध्येतील राम मंदिराला देणगी म्हणून मिळालेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंची चोरी, त्यांचा गैरवापर व अपहार केल्याचा आरोप या आठ जणांवर ठेवण्यात आला असून त्यांच्या विरोधात अयोध्येतील रामजन्मभूमी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
जनतेला आवाहन
हा संवेदनशील विषय असल्याने, जोपर्यंत अधिकृत तपास पूर्ण होत नाही आणि सत्य समोर येत नाही, तोपर्यंत नागरिकांनी सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारच्या अपुऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि अफवा पसरवू नयेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंग रंगड यांनी केले आहे. या तपासानंतरच बद्रीनाथ धामातील या दान चोरीचे नेमके सत्य काय आहे, हे स्पष्ट होईल.
