प्रसिद्ध तीर्थक्षेत्र बद्रीनाथ धामात शंख का वाजवला जात नाही? या धार्मिक आणि पौराणिक परंपरेवरून आता उत्तराखंडमध्ये नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे. “शंख हा हाडापासून बनलेला असतो, म्हणूनच बद्रीनाथ मंदिराच्या आत शंख वाजवण्यास मनाई आहे,” असा दावा उत्तराखंडचे भाजपाचे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून, मंत्र्यांना विज्ञान आणि सनातन धर्म या दोन्ही गोष्टींचे ज्ञान नसल्याची टीका केली आहे. या संदर्भातील वृत्त ‘द इंडियन एक्सप्रेस’ने दिले आहे.
काही दिवसांपूर्वी बद्रीनाथ धाम परिसर एका सांस्कृतिक कार्यक्रमात झालेल्या संगीत आणि नृत्यामुळे चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर बद्रीनाथमधील परंपरांवरून विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री सतपाल महाराज यांनी हे विधान केले.
बद्रीनाथमधील वादाची संपूर्ण पार्श्वभूमी
काही दिवसांपूर्वी बद्रीनाथ येथील ‘टुरिस्ट अरायव्हल प्लाझा’ येथे दोन दिवसीय ‘देवभूमी सांस्कृतिक महोत्सव २०२६’ पार पडला. भारतीय सैन्याचे ‘ऑपरेशन सद्भावना’, चमोली जिल्हा प्रशासन आणि उत्तराखंड पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
उत्तराखंडची लोकसंस्कृती, हस्तकला, स्थानिक खाद्यपदार्थ आणि सीमावर्ती भागातील संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रसिद्ध गायिका प्रियंका मेहेर हिच्या संगीताचा आणि नृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या महोत्सवावरून वाद पेटला. पवित्र धामाच्या परिसरात अशा प्रकारचा संगीताचा कार्यक्रम आयोजित केल्याने धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.
भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनीही यावर आक्षेप घेतला होता. “बद्रीनाथ धामच्या अध्यात्मिक आणि धार्मिक मर्यादेला बाधा आणणाऱ्या अशा डीजे व संगीताच्या कार्यक्रमांना परवानगी देणे अयोग्य आहे,” असे स्पष्ट करत त्यांनी केंद्र व राज्य सरकारला यात हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले होते.
विज्ञान आणि सनातन परंपरेचा अभाव: काँग्रेसचा घणाघात
मंत्र्यांच्या दाव्यानंतर उत्तराखंड काँग्रेसने या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले आहे. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सूर्यकांत धस्माना यांनी सतपाल महाराज यांच्यावर थेट टीका केली. “शंख हे कोणतेही हाड नसून, तो समुद्री जिवाचे बाह्य कवच असतो, जे प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेटपासून बनलेले असते. शंखाला हाड म्हणणे हा विज्ञानाचा आणि शतकानुशतके चालत आलेल्या सनातन परंपरांचा अपमान आहे,” असे धस्माना म्हणाले.
काँग्रेसने आता या प्रकरणी मंत्री सतपाल महाराज यांनी सार्वजनिक माफी मागावी आणि मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी “शंख हाडापासून बनलेला असतो” या मंत्र्यांच्या विधानाशी सरकार सहमत आहे का, याचे स्पष्टीकरण द्यावे, अशी जोरदार मागणी केली आहे.
प्रशासनाची हात झटकण्याची भूमिका
वाद पेटल्यानंतर चमोली जिल्हा प्रशासनाने या आयोजनापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, त्यांनी केवळ स्टॉल्स आणि इतर व्यवस्थेसाठी सहकार्य केले होते, तर कार्यक्रमाची रूपरेषा आणि सादरीकरण पूर्णपणे सैन्याने ठरवले होते.
तसेच, बद्रीनाथचे पौराणिक, अध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेऊनच पुढील कार्यक्रम आयोजित करावेत, असा सल्ला स्थानिक लष्करी अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. नागरिकांनी सोशल मीडियावरील अर्धवट माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
