पीटीआय, डेहराडून

उत्तराखंडातील प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिरातील देणग्यांच्या गैरव्यवहारप्रकरणी श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या (बीकेटीसी) निलंबित कर्मचार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणामुळे राज्यातील सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

प्रमोद नौटियाल या निलंबित कर्मचार्‍याला रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला बद्रीनाथ येथे नेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती चमोलीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक सुरजित सिंह पंवार यांनी दिली.  मंदिर समितीचे अधिकारी युधवीर फरस्वाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून ८ जुलै रोजी बद्रीनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मंदिरातील देणग्यांमधील रोकड आणि काही वस्तूंचा अपहार केल्याचा आरोप नौटियाल यांच्यावर आहे.

श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाला नोटीस

सर्वोच्च न्यायालयाने देणगी गैरव्यवहारप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. सरन्यायाधीश सूर्य कांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासलाही नोटीस बजावली.