प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री बद्रीनाथ धामातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बद्रीनाथ मंदिराला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याप्रकरणी मंदिर समितीच्या एका निलंबित कर्मचाऱ्याविरोधात चामोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे उत्तराखंडमधील देवस्थान वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
प्रमोद नौटियाल असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव असून, तो श्री बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीच्या अध्यक्षांच्या कार्यालयात वैयक्तिक सहाय्यक म्हणून कार्यरत होता.
प्राथमिक चौकशीत गैरव्यवहार झाल्याच उघड
मिळालेल्या माहितीनुसार, बद्रीनाथ धामात देणगीच्या रकमेत अफरातफर होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. यानंतर मंदिर समितीने अंतर्गत प्राथमिक चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशीत देणग्या हाताळताना मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर मंगळवारी आरोपी प्रमोद नौटियाल याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आणि बुधवारी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला.
प्रमोद नौटियालवर काय कारवाई केली?
मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहन सिंह रांगड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा सुगावा लागताच ३ जुलै रोजीच नौटियालला ‘कारण दाखवा’ नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, त्याने नोटिसीला दिलेले उत्तर अत्यंत संशयास्पद वाटल्याने समितीने त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची शिफारस केली.
सध्या नौटियालला जोशीमठ येथील मंदिर समितीच्या मुख्यालयात जोडण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय न सोडण्याचे आदेश त्याला देण्यात आले आहेत. तसेच चालू चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याचे बंधनही त्याच्यावर घालण्यात आले आहे.
नवीन ‘भारतीय न्याय संहिते’नुसार गुन्हे दाखल
देशात नुकत्याच लागू झालेल्या भारतीय न्याय संहितेच्या नवीन कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नौटियालवर खालील कलमांअंर्तगत गुन्हा नोंदवला आहे:
- कलम ३०६: नोकर किंवा कारकुनाने मालकाच्या मालमत्तेची चोरी करणे.
- कलम ३१६(५): गुन्हेगारी स्वरूपाचा विश्वासघात करणे.
देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बद्रीनाथ मंदिरातील या आर्थिक गैरव्यवहारामुळे भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मंदिर समिती आता या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन आणखी कोणाचा यात सहभाग आहे का, याचा शोध घेत आहे.
