चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नीची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातून समोर आली आहे. क्रूरतेची परिसीमा गाठत आरोपी पतीने आधी पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली आणि त्यानंतर तिची गळा आवळून हत्या केली. एवढ्यावरच न थांबता, पत्नी तडफडत असताना आरोपीने तिच्या आई-वडिलांना थेट व्हिडिओ कॉल करून तिची तडफड दाखवली. या विकृत आणि संतापजनक प्रकारामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

दोन महिन्यांनंतर माहेरहून परतली अन् घात झाला

मिळालेल्या माहितीनुसार, भाग्यश्री जिगालूर (वय २३) असे मृत दुर्दैवी महिलेचे नाव असून प्रवीण जिगालूर असे आरोपी पतीचे नाव आहे. बागलकोट जिल्ह्यातील बिलागी तालुक्यातील गलगली गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली.

पती-पत्नीमध्ये गेल्या काही काळापासून सतत खटके उडत होते. या कौटुंबिक वादाला कंटाळून भाग्यश्री गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या माहेरी राहत होती. आरोपी प्रवीणने ‘आता यापुढे सर्व काही ठीक होईल आणि आपण पुन्हा गुण्यागोविंदाने संसार करू’ असे आश्वासन देऊन भाग्यश्रीला घरी परत आणले होते. मात्र, माहेरहून परतलेल्या पहिल्याच संध्याकाळी तिच्यावर काळाने झडप घातली.

सासू-सासऱ्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवला मृत्यूचा थरार

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरी परतल्यानंतर प्रवीणने चारित्र्याच्या संशयावरून भाग्यश्रीशी वाद घातला. वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि त्याने लाकडी दांडक्याने तिच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर हिरव्या रंगाच्या ओढणीने बेडवरच तिची गळा आवळून हत्या केली.

भाग्यश्री फासावर लटकून जीव वाचवण्यासाठी धडपडत असताना आरोपी प्रवीणने मोबाईलवर तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. इतकेच नाही तर, तिच्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉल करून आपल्या पोटच्या लेकीला डोळ्यांदेखत प्राण सोडताना पाहण्यास भाग पाडले. त्यानंतर हा अस्वस्थ करणारा व्हिडिओ त्याने नातेवाईक आणि मित्रांच्या व्हॉट्सॲपवरही पाठवला.

आरोपी पती पोलिसांच्या ताब्यात

घटनेची माहिती मिळताच बिलागी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकारणी बिलागी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पती प्रवीण जिगालूर याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का, याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.