Bageshwar Baba Krishna Statement Controversy : बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा यांच्या एका वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या रूपावर, त्यांच्या उभे राहण्याच्या पद्धतीवर आणि बासरी वाजवण्यावर त्यांनी केलेल्या टिप्पणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या वक्तव्यावरून धार्मिक नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर शास्त्री यांनी माफी मागत आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेल्याचे त्यांनी म्हटले. याबद्दलचे सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील करेरा येथे आयोजित रामकथेदरम्यान शास्त्री यांनी भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या रूपाची आणि स्वभावाची तुलना केली होती. यावेळी त्यांनी अयोध्या आणि वृंदावन या दोन्ही देवस्थानांचाही उल्लेख केला.

‘तुमचे ठाकूरजी उभे राहिले तरी तीन ठिकाणी वाकलेले असतात’

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये धीरेंद्र शास्त्री म्हणत असल्याचे दिसतात, “तुमचे ठाकूरजी प्रत्येक फोटोमध्ये इकडे-तिकडे पाहत असतात. ते उभे राहिले तरी तीन ठिकाणी वाकलेले असतात. त्यांचे पाय एकमेकांवर असतात, कंबर वाकलेली असते आणि मानही वाकवून ते बासरी वाजवतात.”

त्यानंतर त्यांनी भगवान श्रीराम यांच्याशी तुलना करत म्हटले, “आमचे प्रभू अगदी सरळ उभे राहतात. त्यांचे नाव सरळ, ते सरळ पाहतात आणि सरळ चालतात. तुमचे वाकडे उभे राहतात, वाकडे पाहतात आणि वाकडे चालतात.”

एवढ्यावरच न थांबता त्यांनी बासरी वाजवण्यावरही टिप्पणी केली. “बासरी वाजवणे हा एक खेळ आहे; पण धनुष्य चालवणे हा काही खेळ नाही. तुमचे ठाकूरजी जी बासरी वाजवतात, त्यात एवढं काय विशेष? इथे मंचावरही एक व्यक्ती बासरी वाजवत आहे,” असे ते म्हणाले.

मथुरेतील धार्मिक नेत्यांकडून आक्षेप

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मथुरेतील अनेक धार्मिक नेत्यांनी शास्त्री यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. भगवान श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची अशा प्रकारे तुलना करणे अयोग्य असल्याचे त्यांनी म्हटले. दोन्ही देवता एकाच परमेश्वराची रूपे असल्याने अशा वक्तव्यांमुळे भक्तांच्या भावना दुखावू शकतात आणि समाजात भेद निर्माण होऊ शकतो, असा आक्षेप त्यांनी घेतला.

भगवान श्रीकृष्ण यांच्या रूपाचे आणि बासरी वाजवण्याचे वर्णन करण्यासाठी वापरलेल्या भाषेवरही काही धार्मिक नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले. श्रद्धेच्या विषयांवर सार्वजनिक व्यासपीठावर बोलताना धार्मिक व्यक्तींनी अधिक काळजी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले.

“राम आणि कृष्ण यांच्यात भेद निर्माण करण्याचा हेतू नव्हता”

वाढत्या टीकेनंतर धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले. “काही लोकांनी माझ्या शब्दांचा वेगळाच अर्थ लावला आणि चुकीचे निष्कर्ष काढले. भगवान श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यात कोणताही भेद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता, हे मी नम्रपणे स्पष्ट करू इच्छितो,” असे शास्त्री म्हणाले. आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली.

“मी स्वतः कृष्णभक्त आहे”

“मी भगवान श्रीकृष्णांच्या विरोधात नाही. ते आमचे ठाकूरजी आहेत. कृष्ण जन्मभूमीसाठी मी स्वतः अनेकदा आवाज उठवला आहे. त्यांच्या नावाचा माझ्या नावातही समावेश आहे. त्यांच्यामुळेच माझ्या जीवनाला अर्थ आहे,” असे शास्त्री यांनी स्पष्ट केले.

आपण स्वतःला भगवान श्रीकृष्णांचे भक्त आणि ब्रज परंपरेचा भाग मानतो, असेही त्यांनी सांगितले. “समाजात फूट पाडण्याचा किंवा देवतांमध्ये भेद निर्माण करण्याचा माझा प्रयत्न नव्हता. मी देवांमध्ये भेद का निर्माण करू,” असा सवाल करीत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.