Bageshwar Dham chief Dhirendra Shastri meets President Draupadi Murmu: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांची भेट झाल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खुद्द धीरेंद्र शास्त्रींनीच त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर हे फोटो शेअर केले असून त्यामध्ये या भेटीवेळी राष्ट्रपतींशी नेमकी काय चर्चा झाली? याबाबतदेखील धीरेंद्र शास्त्री यांनी माहिती दिली आहे. मात्र. या भेटीसंदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी सूचक पोस्ट केली आहे. आपण राष्ट्रपतींनी प्रबोधनकार ठाकरेंचं एक पुस्तक भेट म्हणून पाठवलं आहे, असं संजय राऊतांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

बागेश्वर शास्त्रींच्या पोस्टमध्ये काय?

धीरेंद्र शास्त्री यांनी गुरुवारी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. “भारताच्या प्रथम नागरिक राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत भेट झाली. राष्ट्रपती भवनात आयोजित करण्यात आलेल्या या भेटीदरम्यान धीरेंद्र शास्त्रींनी राष्ट्रपतींना आगामी देशव्यापी युवा जागरण अभियानाबाबत माहिती दिली”, असं बागेश्वर धामच्या अधिकृत एक्स हँडलवर नमूद करण्यात आलं आहे.

याशिवाय, जेन-झींना देशाच्या उभारणीच्या कामात गुंतवण्यासाठी या मोहिमेअंतर्गत प्रयत्न करणार असल्याचंही राष्ट्रपतींना सांगितल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. यावेळी धीरेंद्र शास्त्रींनी राष्ट्रपतींना कन्या विवाह महोत्सवाचं निमंत्रणदेखील दिल्याचं बोललं जात आहे. या भेटीवेळी धीरेंद्र शास्त्रींनी राष्ट्रपतींना महाराज छत्रसाल यांचा एक फोटो भेट म्हणून दिला.

संजय राऊतांची सूचक पोस्ट

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व बागेश्वर धामचे पीठाधीश्वर धीरेंद्र शास्त्री यांच्या भेटीवर संजय राऊतांनी केलेली सूचक पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.

“आपल्या महान राष्ट्रपती महोदयांनी परमात्मा धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतली व अनेक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली! देश आगे जा रहा है. राष्ट्रपती महोदयांना मी प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे क्रांतिकारी पुस्तक भेट म्हणून पाठवले आहे!” असं संजय राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे…

‘देवळांचा धर्म आणि धर्माची देवळे’ हे पुस्तक समाजसुधारक व लेखक प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिले असून त्यामध्ये धर्म, देवळे, सामाजिक व धार्मिक रुढी यांच्याबाबत परखड भाष्य केलं आहे. १९२६ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली होती.