Baghpat DM Meeting Viral Video : सध्या सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. याच व्हायरल व्हिडीओवरून अनेक वेगवेगळे विषय चर्चेत येत असतात. हे व्हिडीओ कधी-कधी एखाद्या मजेशीर घटनेचे असतात, तर कधी-कधी एखाद्या धक्कादायक घटनेचेही असतात. आता अशाच एका मजेशीर घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांचा शेतकऱ्यांबरोबरच्या एका बैठकीतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांची शेतकऱ्यांबरोबर एक महत्वाची बैठक सुरू असते. पण या बैठकीत त्यांच्या जवळ अचानक एक माकड येतं आणि काही वेळ गोंधळ निर्माण होतो. यावेळी जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांनी चक्क माकडासाठी आपली खुर्ची दिल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कृतीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर IAS अस्मिता लाल नेमकं कोण आहेत आणि नेमकं काय घडलं? याबाबत थोडक्यात जाणून घेऊयात.

नेमकं काय घडलं?

उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची प्राण्यांप्रति असणारी माणुसकी आणि संवेदनशीलतेचं एक अनोख दृश्य पाहायला मिळालं आहे. जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये सुरू असलेल्या एका महत्वाच्या बैठकीदरम्यान एक अनोख दृश्य पाहायला मिळालं आणि या घटनेने सर्वांची मने जिंकली आहेत.

झालं असं की, विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी बागपत जिल्हा प्रशासन आणि शेतकऱ्यांमध्ये एक बैठक सुरू होती. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा सुरू होत्या. याचवेळी एक माकड बैठकीत आलं आणि थेट जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांच्या जवळ येऊन थांबलं. त्यानंतर जिल्हाधिकारी अस्मिता लाल या स्वत:च्या खुर्चीवरून उठल्या आणि माकडाला आपली खुर्ची दिली आणि माकडाला खुर्चीवर बसायला सांगितलं, तर चक्क ते माकडही त्या खुर्चीवर बसलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

त्यानंतर तेथील संबंधित कर्मचाऱ्यांनी त्या बैठकीतून त्या माकडाला बाहेर काढलं. पण या संपूर्ण घटनेमुळे काही वेळ गोंधळ उडाला होता. तसेच ही घटना काहींनी त्यांच्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. त्यानंतर या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी जिल्हाधिकारी अस्मिता लाल यांच्या या कृतीचं कौतुक केलं आहे.

अस्मिता लाल कोण आहेत?

अस्मिता लाल या भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०१५ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म १७ डिसेंबर १९८९ रोजी दिल्लीत झाला. त्यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१५ मध्ये त्या आयएएस अधिकारी झाल्या. त्यानंतर त्यांनी ७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. सध्या त्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी १८ जानेवारी २०२५ रोजी बागपत येथे आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्या स्पष्टवक्तेपणा आणि त्यांच्या कार्यनिष्ठेमुळे त्या नेहमीच चर्चेत असतात.

IAS अस्मिता लाल यांची का होतेय चर्चा?

आयएएस अधिकारी अस्मिता लाल यांचं प्राण्यांप्रति असणारं प्रेम आणि माणुसकी व संवेदनशीलता पाहून सोशल मीडियावर अनेकजण अस्मिता लाल यांचं कौतुक करत आहेत. तसेच याआधी आयएएस अधिकारी अस्मिता लाल यांचा शेतकऱ्यांबरोबर जेवण करतानाचाही एक व्हिडीओ समोर आला होता. शेतकऱ्यांसोबत जेवायला बसणं किंवा मुक्या प्राण्यांनाही सहजतेनं वागवणं यामधून त्यांचा साधेपणा दिसून येतो. त्यामुळे त्या फक्त एक अधिकारीच नाही, तर लोकांच्या भावना समजून घेणारी एक व्यक्ती म्हणून देखील त्यांची सध्या चर्चा होत आहे.