Anant Singh takes oath as Mokama MLA: बिहारच्या राजकारणात ‘छोटे सरकार’ म्हणून ओळखले जाणारे संयुक्त जनता दलाचे नेते आणि मोकामाचे निवनिर्वाचित आमदार अनंत कुमार सिंह आता पुन्हा चर्चेत आले आहेत. पटना दिवाणी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर अनंत सिंह यांनी मंगळवारी (३ फेब्रुवारी) रोजी बिहार विभानसभेच्या सभागृहात आमदारपदाची शपथ घेतली. हत्येच्या आरोपाखाली अटकेत असतानाही त्यांनी बिहारच्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. त्यांना या निवडणुकीत ९१ हजार ४१६ मते मिळाली होती. तर विरोधी उमेदवाराचा त्यांनी २८ हजार २०६ मतांनी पराभव केला होता.

नितीश कुमारांच्या पाया पडल्या

आमदारपदाची शपथ घेण्यासाठी सभागृहात आल्यानंतर अनंत कुमार सिंह यांनी सुरुवातीला बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना नमस्कार घालत त्यांच्या पाया पडल्या आणि आशिर्वाद घेतला. नितीश कुमारांनीही नमस्कार करत अनंत सिंह यांना शुभेच्छा दिल्या. दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी २ नोव्हेंबर २०२६ रोजी अनंत कुमार यांना अटक करण्यात आली होती. तुरुंगातून निवडून आलेल्या उमेदवाराला आमदारकी मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण आज अखेर अनंत सिंह यांनी आमदारपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अनंत सिंह यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. कडक सुरक्षा पहाऱ्यात हा शपथविधी पार पडला.

अनंत सिंह का आहेत तुरुंगात?

बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान मोकामा येथे हिंसाचार झाला होता. या हिंसाचारात ७५ वर्षीय दुलारचंद यादव यांचा मृत्यू झाला होता. यादव हे जन सुराज्य पक्षाचे उमेदवार पीयूष प्रियदर्शी यांचा प्रचार करत होते. प्रचारादरम्यान त्यांची अनंत सिंह यांच्या समर्थकांशी झटापट होऊन जोरदार हाणामारी आणि गोळीबार झाला होता. या गोळीबारात दुलारचंद यादव यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, यादव यांचा मृत्यू कोणती तर जड वस्तू अंगावर पडल्याने झाला होता. तसेच यादव यांच्या शरीरावर गोळीबाराच्या जखमाही होत्या. ही घटना घडली तेंव्हा तिथे अनंत सिंहही उपस्थित होते असा दावा दुलारचंद यादव यांच्या घरच्यांनी केला आहे. तसेच यादवर यांना वाहनाने चिरडून ठार मारल्याचा आरोपही केला गेला होता. या प्रकरणात पोलिसांनी अनंत सिंह यांच्यासह ८० हून अधिक लोकांना अटक केली होती.

खून प्रकरणात दोषी ठरूनही दिलासा

दुलारचंद यादव यांची बिहार विधानसभा निवडणुकीदरम्यान हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात अनंत सिंह यांना आरोपी करण्यात आले होते. दुलारचंद यादव हत्या प्रकरणासह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचे नाव असून, त्यांना दोषी ठरवण्यात आल्यामुळे अनंत सिंह यांचे विधिमंडळातील सदस्यत्व धोक्यात आले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना पाटणा दिवाणी न्यायालयाने विशेष सुरक्षेत शपथविधी सोहळ्याला परवानगी दिली. त्यामुळे अनंत सिंह लवकरच विधानसभेत जाऊन आमदारपदाची शपथ घेतली.

दोनदा परवानगी नाकारली होती

मोकामा येथील हिंसाचारात दुलारचंद यादव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात अनंत सिंह आणि त्यांच्या समर्थकांवर हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. त्या वेळी अनंत सिंह यांना अटक करण्यात आली होती आणि तेव्हापासून ते पाटणा येथील बेऊर कारागृहात आहेत. ते सातत्याने जामिनासाठी प्रयत्न करत होते. यापूर्वी त्यांनी दिवाणी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता, मात्र तो फेटाळण्यात आला होता. बिहार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार म्हणून शपथ घेण्यासाठी त्यांनी जामीन मागितला होता, परंतु खासदार-आमदार न्यायालयाने त्यांना परवानगी नाकारली होती. अखेर पाटणा दिवाणी न्यायालयाने त्यांना शपथ घेण्यासाठी परवानगी दिली असून, आज अनंत सिंह यांनी आमदारपदाची शपथ घेतली.