मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, मायावतींची घोषणा

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे

मायावतींनी ट्विट करत आपल्या नाराज कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आपण लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची मोठी घोषणा केली आहे. सध्या आमची आघाडी चांगल्या स्थितीत असून पक्ष आणि जनहितासाठी आपण निवडणूक लढणार नसल्याचं मायावती यांनी सांगितलं आहे. पुढे गरज लागल्यास आपण कोणत्याही जागेवरुन निवडणूक लढवू शकतो असंही मायावती यांनी सांगितलं आहे. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची आघाडी झाली असून काँग्रेसकडून 7 जागा सोडण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मायावती यांनी म्हटलं आहे की, ‘सध्या मी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढे मला वाटलं तर कोणतीही जागा रिक्त करत निवडणूक लढवून मी लोकसभा खासदार होऊ शकते. मी निवडणूक लढवायचं ठरवलं तर मनाई करुनही कार्यकर्ता माझ्यासाठी प्रचार करण्यासाठी जातील. याचा परिणाम इतर जागांवर होईल. यामुळेच आपण हा निर्णय घेतला आहे’.

उत्तर प्रदेशात काँग्रेसने आघाडीसाठी सपा-बसपाला 7 जागा सोडल्याच्या वृत्तानंतर बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती या चांगल्याच भडकल्या होत्या. उत्तर प्रदेशात काँग्रेससोबत आमची कुठलीही आघाडी झालेली नाही, हे मी पुन्हा एकदा मी स्पष्ट करते असे त्यांनी ट्विट करुन म्हटले होते.

पुढे त्या म्हणाल्या होत्या की, काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशातही पूर्णपणे स्वतंत्र आहे. त्यांनी इथे सर्व 80 जागांवर उमेदवार उभे करुन एकट्याने निवडणूक लढवावी. आमची आघाडी (सपा-बसपा) एकटी भाजपाला पराजित करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहे. त्यामुळे काँग्रेसने जबरदस्तीने उत्तर प्रदेशात सपा-बसपा-रालोदला 7 जागा सोडल्याची अफवा पसरवू नये.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bahujan samaj partychief mayawati will not contest the lok sabha elections