शनिवारी ( ३ जून ) मध्यरात्री कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. यावर कुस्तीपटू बजरंग पुनिया याने भाष्य केलं आहे. “अमित शाह यांच्याशी आमची बैठक झाली. बैठकीत सरकारकडून आम्हाला सांगण्यात आलं की, येथील चर्चा बाहेर बोलायची नाही. गृहमंत्र्यांबरोबर आमची कोणतीही वाटाघाटी झाली नाही. पण, गृहमंत्र्यांनी सांगितलं की, तपास सुरु आहे,” असं बजरंग पुनियाने म्हटलं आहे. तो ‘एनडीटीव्ही’शी बोलत होता.
“आम्ही रेल्वेमधून सुट्टी घेतली होती. सुट्टी संपल्याने सही करण्यासाठी गेलो होता. आंदोलनाच्या आड नोकरी आली, तर ती सोडण्यासाठी तयार आहे. तसेच, अल्पवयीन तरुणीने आपली तक्रार माघारी घेतली नाही. तरुणीच्या वडिलांनी समोर येत सांगितलं, की तक्रार माघार घेतली नाही. आमचं आंदोलन सुरु राहणार आहे. आम्हाला आंदोलन करण्यापासून कोणीही थांबवू शकत नाहीत. आम्ही या देशाचे नागरिक आहोत,” असं बजरंग पुनियाने सांगितलं.




“१ ते २ दिवसांत आंदोलनाची पुढील रणनिती आम्ही ठरवू. २८ एप्रिलला पोलिसांनी जे आमच्याबरोबर केलं, तो भारताच्या इतिहासातील काळा दिवस होता. संसद भवनाच्या बाहेर आंदोलन करणे हा आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार होता. त्यामुळे पदकं विसर्जित करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नव्हता,” असेही बजरंग पुनियाने म्हटलं.
हेही वाचा : लोकसभेला कर्नाटकात जेडीएस भाजपाबरोबर युती करणार? कुमारस्वामी म्हणाले, “आमचा पक्ष…”
“ऑलम्पिकमध्ये सर्व खेळाडूंनी आतापर्यंत २१ पदके आणली आहेत. पण, आम्हाला सन्मान मिळाला नाही. सन्मान मिळाला असता, तर हे दिवस पाहण्याची वेळ आली नसती. आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आमची लढाई सुरू राहणार,” असा निर्धार बजरंग पुनियाने व्यक्त केला आहे.