पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये पाकिस्तानी लष्कर आणि तेथील स्थानिक प्रशासनाकडून होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या करिमा बलूच यांचं निधन झालं आहे. बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार करिमा यांचा मृतदेह कॅनडामधील टोरांटो येथे सापडला आहे. करिमा यांनी कॅनडामध्ये आश्रय घेतला होता. २०१६ साली बीबीसीच्या १०० सर्वाधिक प्रभावशाली स्त्रीयांच्या यादीमध्ये करिमा यांचा समावेश होता. रविवारी करिमा बेपत्ता झाल्या होत्या. दुपारी तीनच्या सुमारास त्या शेवटच्या दिसल्या होत्या. टोरांटो पोलिसांनी करिमा यांचा शोध घेण्यासाठी स्थानिकांची मदत घेत करिमा यांच्यासंदर्भात काही माहिती असल्यास कळवावी असं आवाहन केलं होतं. मात्र आता करिमा यांचा मृतदेह सापडल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.

करिमा या बलुचिस्तानमध्ये अंत्यंत लोकप्रिय होत्या. महिलांसाठी लढा देणाऱ्या समाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. स्वित्झर्लंडमधील संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेदरम्यान करिमा यांनी बलुचिस्तान हा विषय उपस्थित केला होता. मे २०१९ रोजी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये पाकिस्तान सरकार बलुचिस्तानमधील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करत असले तरी तेथील लोकांना फारशी किंमत देत नसल्याचे करिमा यांनी म्हटलं होतं. करिमा यांच्या मृत्यूसंदर्भात शंका उपस्थित केली जात असल्याचे बलुचिस्तान पोस्टने म्हटले आहे.

बलुचिस्तानमधील स्थानिकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या आणि या लढ्यात सक्रीय सहभाग असणाऱ्या व्यक्तीचा अशाप्रकारे संक्षयितरित्या मृत्यू होण्याचे हे काही पहिलेच प्रकरण नाही. यापूर्वीही बलुचिस्तानमधील पत्रकार साजिद हुसैन यांचा अशाचप्रकारे स्वीडनमध्ये मृत्यू झाला होता. ते उपासाला येथून दोन मार्चपासून बेपत्ता होते आणि नंतर थेट त्यांचा मृतदेहच हाती लागला होता.

पाकिस्तानमध्ये लष्कर आणि त्यांच्या मार्फत होणाऱ्या अत्याचारांविरोधात आवाज उठवणाऱ्यांना सरकारी यंत्रणांकडून त्रास दिला जातो. अनेकदा अशा सामाजिक कार्यकर्त्यांच्या जीवाला धोका असल्याने ती इतर देशांमध्ये शरणार्थी म्हणून राहतात. बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्कराकडून मानवी हक्कांचे उल्लंघन, स्थानिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या अनेकदा समोर येत असतात. मागील १५ वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये लष्कर विरुद्ध स्थानिक हा वाद सुरु आहे. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. त्यामुळेच येथे आपला दबदबा निर्माण करण्याचा पाकिस्तानी लष्कराचा कायमच प्रयत्न असतो. त्यामुळेच स्थानिकांबरोबर त्यांचे अनेकदा संघर्ष होताना पहायला मिळतो.