Baloch Army captures 7 Pakistani soldiers: बलुच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैन्याच्या सात जवानांना पकडल्याचा दावा केला आहे. खुजदार, ओरंच भागात बलुच आर्मीने ही कारवाई केल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसांपासून बलुच आर्मीने ऑपरेशन हेरोफ फेज २ सुरु केले असून, त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. बलुच आर्मीने जवानांच्या बदल्यात कैद्यांना सोडण्याची मागणी केली आहे. यासाठी आर्मीकडून पाकिस्तानला सात दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.
जवानांना पकडल्याचा व्हिडिओ
बलुच आर्मीने जवानांना पकडल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात पाकिस्तानी आर्मीचा युनिफॉर्म घातलेले सात जवान गुडघ्यावर बसल्याचे दिसत आहे. यातील एक जवानाने व्हिडिओत बोलताना तो पाकिस्तान जवान असल्याचे सांगितले आहे.
बीएलएच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती
हा जवान ऑक्टोबर २०२२मध्ये पाकिस्तानी लष्करात भरती झाला होता. तो जवान कराचीला जात असताना त्याला बलुच आर्मीच्या जवानांनी पकडले. जवानाने पाकिस्तान लष्कराकडे मदतीचे आवाहन केले असून, बलुच आर्मीच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. बलुच आर्मीच्या मागण्या पूर्ण केल्या तर त्याची सुखरुप सुटका होईल, अशी आशा त्याने व्यक्त केली आहे.
व्हिडिओची सत्यता
पाकिस्तानी सैनिकांकडून जप्त करण्यात आलेली शस्त्रे आणि दारुगोळा देखील या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, या व्हिडिओची सत्यता अद्याप समोर आलेली नाही.
मरियम नवाज यांची भेट
पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री मरियम नवाज शरीफ यांनी लाहोरमध्ये शहीद झालेल्या लष्करी अधिकाऱ्याच्या कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी कॅप्टन मुहम्मद अली कुरेशी यांच्या घरी भेट दिली. कुरेशी बलुचिस्तानमध्ये कर्तव्य बजावताना शहीद झाले होते.
