Balochistan Independence Day: पाकिस्तानपासून वेगळ्या देशाची घोषणा केल्यानंतर आता बलुचिस्तानने वेगळ्या स्वातंत्र्यदिनाची देखील घोषणा केली आहे. येत्या ११ ऑगस्ट रोजी बलुचिस्तान त्यांचा पहिला स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहे. काही दिवसांपूर्वीच बलुचिस्तान वेगळा देश असल्याचे एक पत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यात बलुचिस्तानकडून स्वतंत्र राष्ट्रीय ध्वज, चलन, राष्ट्रगीताची घोषणा केली होती. जगाने देखील बलुचिस्तानला मान्यता द्यावी अशी विनंती व्हायरल पत्रकातून करण्यात आली होती.
११ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन
११ ऑगस्ट रोजी बलुचिस्तान स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे आवाहन करणारे एक पत्रक आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहे. या पत्रकातून बलुच लोकांना हा दिवस उत्साहात साजरा करण्याचे आवाहन केले आहे. बलुच नेते मीर यार बलुच यांनी नागिरकांना राष्ट्रध्वज फडकवण्याचे आवाहन केले आहे. “संपूर्ण बलुच राष्ट्रातील लोकांनी आपापल्या घरांवर, वस्त्या, बाजारपेठा, दुकाने, शैक्षणिक संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणी स्वतंत्र बलुचिस्तानचा राष्ट्रध्वज फडकवावा”, असे त्यांनी आवाहन केले आहे.
बलुच नेते मीर यार बलुच काय म्हणाले?
भविष्यातील पिढ्यांना यातून प्रेरणा मिळेल, असेही बलुच नेते मीर यार बलुच यांनी म्हटले आहे. हा दिवस ऐतिहासिक आणि अत्यंत महत्वाचे असल्याचे देखील बलुच यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पत्रकानुसार, बलुचिस्तान ११ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करेल, दरवर्षी हा दिवस साजरा केला जाईल. पाकिस्तानच्या धोरणांचा केवळ या प्रदेशावरच नव्हे, तर जगाच्या इतर भागांवरही झाला आहे, असेही पुढे पत्रकात म्हटले आहे.
पत्रकात काय दावा केलाय?
या पत्रकात काश्मीर, मार्च १९४८ मधील बलुचिस्तानमधील लष्करी कारवाई, पूर्व पाकिस्तानमधील १९७१ चा संघर्ष, जॉर्डनमधील पॅलेस्टिनींचा समावेश असलेल्या कारवाया, सोव्हिएत-अफगाण युद्ध, चगाई जिल्ह्यातील १९९८ च्या अणुचाचण्या आणि अमेरिकेतील ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतरच्या घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे बलुचिस्तानमध्ये अशांतता, वाद, संघर्ष आणि रक्तपात झाल्याचा या पत्रकात म्हटले आहे. जगाने देखील बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याची मागणी या पत्रकातून करण्यात आली आहे.
११ ऑगस्टच का?
स्वातंत्र्य दिनासाठी ११ ऑगस्टची निवड का करण्यात आली? याबाबत पत्रकात उल्लेख केल्याप्रमाणे, ब्रिटिशांना देश सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा बलुचिस्तानने ११ ऑगस्ट १९४७ रोजी प्रथम आपले स्वातंत्र्य घोषित केले. या घोषणेची बातमी ‘द न्यूयॉर्क टाइम्स’सह आंतरराष्ट्रीय माध्यमांनी दिली होती आणि ‘ऑल इंडिया रेडिओ’ने प्रसारित केली होती, असा दावा त्यांनी केला आहे. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन असतो.
