Balochistan Violence Pakistan News : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित संघर्षाचा वणवा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतातील हा हिंसाचार काही नवीन नाही. अनेक दशकांपासून या भागात दहशतवाद, फुटीरतावादी चळवळी आणि सरकारी दडपशाहीचे चक्र सुरूच आहे. आता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या तब्बल २५ जवानांना ठार केल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पाकिस्तानात एकच खळबळ उडाली आहे.

बीएलएने केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराकडूनही तीव्र प्रत्युत्तर देण्यात आल्यामुळे आता अशांत बलुचिस्तान प्रांतात पुन्हा तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत बीएलएने पाकिस्तानी सैन्याविरुद्धची आपली सशस्त्र मोहीम पुन्हा तीव्र केल्याचं बोललं जात आहे.

आता बीएलएकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. यामध्ये स्फोट, गोळीबार आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला पाकिस्तानी लष्कराचा एक ट्रक दिसत आहे. या संदर्भात बीएलएने शुक्रवारी दावा केला की, त्यांच्या ‘फतेह स्क्वॉड’च्या युनिटने पाकिस्तानमधील झियारत क्रॉस या ठिकाणी लष्करी ताफ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात दोन वाहने नष्ट करण्यात आले असून या घटनेत पाकिस्तानी लष्कराचे १८ जवान ठार झाले आहेत. तर इतर पाच जवान जखमी झाल्याचा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, मागील काही महिन्यांत बलुच फुटीरतावाद्यांनी केलेल्या सर्वात मोठ्या आणि धाडसी हल्ल्यांपैकी हा एक हल्ला होता असं बोललं जात आहे. बीएलएच्या एका अधिकृत माध्यम वाहिनीने जारी केलेल्या व्हिडीओत सशस्त्र लढाऊ सैनिक लष्कराच्या खराब झालेल्या ट्रकमधून शस्त्र हस्तगत करताना दिसत आहेत.

दुसऱ्या एका हल्ल्यात ७ पाकिस्तानी सैनिक ठार

बीएलएने दावा केला आहे की सुरबमधील हाजिका येथे झालेल्या एका वेगळ्या हल्ल्यात त्यांच्या एसटीओएस (स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉड) या तुकडीने रिमोट-कंट्रोलद्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनातील स्फोट घडवून आणला. या घटनेत ७ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या दोन्ही हल्ल्याच्या घटनेबाबत पाकिस्तानने कोणताही अधिकृत तपशील जाहीर केलेला नाही. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्करी जवानांचे मृतदेह अंधाराचा फायदा घेऊन त्यांच्या कुटुंबीयांकडे गुपचूप पाठवले जात असल्याचं दिसत आहे.