Balochistan Liberation Army: पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान सध्या धुमसत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेल्या दीड महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. तर, बलुचिस्तानमधील नागरिक लष्कराच्या दबाव आणि अपहरणाच्या घटनांमुळे त्रस्त आहेत. काही दिवसांपूर्वी वेगळा देश म्हणून घोषणा करणाऱ्या बलुचिस्तानने पाकिस्तानच्या ४५ जवानांना ठार केले आहे. बलुचिस्तान पोस्टच्या वृत्तानुसार, गुरुवारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या ४५ जवांनाना ठार केले. दोन आठवड्यांत पाकिस्तानी जवानांवर तिसऱ्यांदा हा मोठा हल्ला झाला आहे.
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली जबाबदारी
पाकिस्तानी जवानांवर हल्ला झाल्याची पुष्टी पाकिस्तानी लष्कराने केली असली तरी, किती जवान ठार झाले? याची माहिती देण्यात आलेली नाही. या हल्ल्याची जबाबदारी बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने स्वीकारली आहे. लिबरेशन आर्मीचे प्रवक्ते जीयांद बलोच यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे या हल्ल्याची माहिती दिली आहे. “बीएलएच्या जवानांनी पाकिस्तानी सैनिकांच्या ताफ्यावर हल्ला केला, हल्ला सुरु झाल्यानंतर आलेल्या इतर लष्करी कर्मचाऱ्यांवर देखील गोळीबार केला”, अशी माहिती बलोच यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
पाकिस्तानकडूनही ऑपरेशन सुरु
जीयांद बलोच यांनी पत्रकात पुढे म्हटल्याप्रमाणे हा बीएलएच्या फतेह ग्रुपने हा हल्ला केला, हा हल्ला संयुक्तपणे करण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पत्रक प्रसिद्ध केले त्यावेळी देखील चकमक सुरु होती आणि मृतांची संख्या वाढण्याची शक्यता बलोच यांनी वर्तवली. पाकिस्तानी पोलिस आणि जवानांवर हल्ल्याच्या वाढत्या घटना लक्षात घेता, पाकिस्तानी लष्कराने “ऑपरेशन शाबाण” सुरु केले आहे. मांगी धरण परिसरात झालेल्या हल्ल्यात २७ पोलिस आणि लासबेला येथे झालेल्या हल्ल्यात ११ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला होता. यानंतर पाकिस्तानकडून खबरदारी घेतली जात आहे.
पाकिस्तानचा इशारा
पाकिस्तान “ऑपरेशन शाबाण” राबविण्यासाठी लष्कर, फ्रंटीयर कॉर्प्स, बलुचिस्तान पोलिस, हवाई दल आणि गुप्तचर यंत्रणांची देखील मदत घेत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते ले. जनरल शरीफ चौधरी यांनी या हल्ल्याप्रकरणी इशारा देताना, जे कोणी जबाबदार असतील त्यांना शोधून ठार केले जाईल, असा इशारा दिला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बलुचिस्तानने आपण स्वतंत्र देश असल्याचे जाहीर करताना, पाकिस्तानपासून वेगळं झाल्याचे म्हटले होते. याप्रकरणी व्हायरल झालेल्या एका निवेदनात बलुचिस्तान वेगळा देश असल्याचा दावा करण्यात आला होता.
बलुचिस्तान वेगळा देश असल्याचा दावा
बलुचिस्तान वेगळा देश असल्याचा दावा करणाऱ्या या निवेदनात बलुचिस्तानचे वेगळे चलन, राष्ट्रगीत, राष्ट्रीय ध्वज असेल असेही म्हटले होते. सध्या देशाकडे स्वत:चे लष्कर, हवाई किंवा नौदल नसले तरी भविष्यात सज्ज होण्याचा मानस पत्रकातून व्यक्त करण्यात आला होता.
