Pakistan forces killed 145 militants in Balochistan: बलुचिस्तान प्रांतातील हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या सशस्त्र दलाने मोठी कारवाई केली आहे. आतापर्यंत या कारवाईत १९० हून अधिक लोक मारले गेले आहेत. मृतांमध्ये दहशतवादी, नागरिक आणि सुरक्षा दलांतील काही जणांचा समावेश आहे. सुरुवातीला या हल्ल्यामागे भारत असल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. भारताने पाकिस्तानचे हे खोटे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

१४५ हल्लेखोर दहशतवादी ठार

बलुचिस्तान प्रांताच्या मुख्यमंत्री सरफराज बुगती यांच्या म्हणण्यानुसार, ‘दहशतवाद्यांनी बँका, तुरुंग, पोलिस स्टेशन आणि लष्करी ठाण्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये किमान ३१ नागरिक आणि १७ सुरक्षा कर्मचारी ठार झाले होते. त्यानंतर बलुचिस्तानच्या मोठ्या भागात सैन्याने शोधमोहीम सुरू केली होती त्यात अनेक दहशतवाद्यांना मारण्यात आले. आतापर्यंत या कारवाई किमान १४५ हल्लेखोर दहशतवादी मारले गेले आहेत’. गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण प्रांतात मोबाईल इंटरनेट सेवा ठप्प होती, असे वृत्त ‘एएफपी’ वृत्तसंस्थेने दिले आहे. रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे आणि रेल्वे सेवा बंद आहे.

क्वेट्टाच्या रस्त्यांवर भयाण शांतता

सध्या बलुचिस्तान प्रांतात एवढी दहशत निर्माण झाली आहे की नागरिक घराबाहेर पडायला घाबरत आहेत. “घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येकाला सुरक्षित परत येण्याची खात्री नाही. मनामध्ये सतत भीती असते,” असे ३९ वर्षीय दुकानदार हमदुल्लाह यांनी क्वेटा येथील वृत्तसंस्थेला सांगितले. हल्ल्यानंतर बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटामध्ये भयान शांतता पसरलेली होती. शहरातील प्रमुख रस्ते आणि व्यवसाय ओसाड पडले होते आणि लोक भीतीने घरातच होते.

स्वातंत्र्यापासून संघर्ष सुरू

बलुचिस्तान प्रांतात बलुच फुटीरतावादी बंडखोरी अनेक दशकांपासून सुरू आहे. जेव्हापासून ब्रिटिशांनी भारताचे विभाजन केल्यानंतर पाकिस्तान उदयास आला आणि त्यानंतर त्यांचे वसाहतवादी राज्य संपले त्यावेळीपासून बलुच फुटीरतावादी बंडखोर आणि पाक सरकारमध्ये संघर्ष सुरू आहे. पंजाबी बहुल पाकिस्तानमध्ये बलुचींची संस्कृती, भाषा आणि वांशिकतेचा आदर केला जात नाही असा दावा बलुच गट करतात. अफगाणिस्तान आणि इराणच्या सीमेला लागून असलेल्या खनिजांनी समृद्ध प्रांतात हे गट सुरक्षा दलांवर आणि कधीकधी परदेशी नागरिकांवर आणि स्थानिक नसलेल्या पाकिस्तानी लोकांवर वारंवार सशस्त्र हल्ले करतात.

सर्वात मोठा प्रांत

बलुचिस्तान हा पाकिस्तानमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रांत आहे. तसेच हा प्रदेश शिक्षण, रोजगार आणि आर्थिक विकासासह जवळजवळ प्रत्येक निर्देशांकात पाकिस्तानातील इतर प्रांतांच्या मागे आहे. मुख्यमंत्री सरफराज बुगती यांनी क्वेट्टा येथे पत्रकार परिषदेत सांगितले की, ज्या भागात हल्ले झाले होते त्या सर्व भागात आता सुरक्षा यंत्रणा कार्यरत आहेत. आम्ही हल्लेखोरांचा पाठलाग करत आहोत, आम्ही त्यांना इतक्या सहजपणे जाऊ देणार नाही. आमचे रक्त इतके स्वस्त नाही. आम्ही त्यांच्या लपण्याच्या ठिकाणापर्यंत त्यांचा पाठलाग करू. असेही ते म्हणाले. बलुचिस्तान प्रांतातील सर्वात सक्रिय फुटीरतावादी गट ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने (बीएलए) ‘एएफपी’ला पाठवलेल्या निवेदनात हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहे.