Panaji Goa Casino Controversy: गोव्याची राजधानी पणजी येथील मांडवी नदीत नव्याने येणाऱ्या ११२ मीटर लांब आणि ३० मीटर उंच कॅसिनोविरोधात स्थानिक रस्त्यावर उतरले आहेत. लहान कॅसिनो हटवून त्याजागी अवाढव्य कॅसिनो मांडवीत दाखल होणार आहे. यावरुन स्थानिकांनी रस्त्यावर उतरत कॅसिनोला विरोध करत आहेत. ‘कॅसिनोमुळे संवेदनशील सागरी परिसंस्था नष्ट होत आहे’, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

अधिक क्षमतेच्या अवाढव्य कॅसिनोला विरोध

मांडवी नदीत ११२ मीटर लांब कॅसिनो दाखल होणार आहे. या कॅसिनोची जवळपास दोन हजार लोकांची क्षमता असेल. महत्वाची बाब म्हणजे जुन्या लहान आकाराच्या कॅसिनोच्या जागी हा अवाढव्य कॅसिनो येणार आहे. पूर्वीच्या सरकारने मांडवी नदीतून कॅसिनो हटवणार असल्याचे आश्वासन दिले होते. पण, नंतरच्या काळात कॅसिनोंना मुदतवाढ देण्यात आली, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

स्थानिकांच्या मागण्या काय आहेत?

मंगळवारी मोठ्या संख्येने स्थानिकांनी कॅसिनोविरोधात निदर्शने केली. यावेळी उपस्थितांनी काही ठराव देखील मंजूर केले. ‘सरकारने ११२ मीटर लांब आणि ३० मीटर उंच कॅसिनोला मांडवीतच नव्हे तर गोव्यात कुठेही येण्यास परवानगी देऊ नये’, अशी प्रमुख मागणी यावेळी स्थानिकांनी केली. 

“कॅसिनोसाठी नदीतून गाळ काढणे किंवा इतर उद्योग करु नयेत. यामुळे सागरी परिसंस्था नष्ट होत आहे. जुगार अड्डा म्हणून राज्याचा प्रचार करणे सरकारने थांबवावे. तसेच, मांडवी नदीतून कॅसिनो हद्दपार करण्यासाठी एक नियोजनबद्ध आराखडा तयार करावा”, अशा मागण्या स्थानिकांनी यावेळी केल्या.

‘कॅसिनोत काम करणाऱ्या गोमंतकीयांना सरकारने पुनर्वसन पॅकेज द्यावे, तसेच सध्या कॅसिनो पर्यटकांना सेवा देणाऱ्या स्थानिक व्यवसायांसाठी पर्यायी महसूल मॉडेल्स लागू करावेत. गोव्याला कौटुंबिक पर्यटन स्थळ म्हणून प्रोत्साहन देण्यात यावे’, असेही काही ठराव स्थानिकांनी यावेळी केले.

सरकारच्या तिजोरीत कोट्यवधींचा महसूल

अलिकडच्या राज्य विधानसभेच्या अधिवेशनात सादर केलेल्या आकडेवारीनुसार, गोव्यात पणजीतील मांडवी नदीत सहा ऑफशोअर कॅसिनो आणि १६ ऑनशोअर कॅसिनो आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत परवानाधारक ऑनशोअर आणि ऑफशोअर कॅसिनोनी राज्याच्या तिजोरीत १७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा केला आहे.

सरकारने मेसर्स डेल्टा प्लेजर क्रूझ कंपनी प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मालकीच्या एका नवीन कॅसिनोला तत्वतः मंजूरी दिली आहे. मांडवीत नव्याने येणारा अवाढव्य कॅसिनो ‘एमव्ही रॉयल फ्लोटेल’ची जागा घेईल, असा दावा केला जात आहे. मोठा कॅसिनोची क्षमता सर्व सहा कॅसिनोच्या तुलनेत अधिक असेल. 

राजकीय विरोध

आम आदमी पक्षाने देखील कॅसिनोवरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. आपचे गोवा प्रमुख वाल्मिकी नाईक यांनी ‘ऐतिहासिक पणजी शहर आता जुगार अड्डा बनले आहे’, असा आरोप केला. “मांडवी नदी आणि पणजी शहर नष्ट करण्याची सरकारची ही योजना आहे. मांडवीत मोठ्या आकाराचा कॅसिनो आणला जात आहे. हा कॅसिनो पणजीतील बहुतेक इमारतींपेक्षा मोठे असेल. कॅसिनो मांडवी येऊ दिला जाणार नाही याबाबत नागरिकांमध्ये जागृकता निर्माण करण्यासाठी बैठक घेतली”, असे नाईक म्हणाले आहेत.