scorecardresearch

गोवंश हत्याबंदीचा कायदा देशभरात लागू करा- मनेका गांधी

गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला धार्मिक रंग देणे योग्य नसून हा कायदा देशभरात लागू करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केली.

गोवंश हत्याबंदीच्या निर्णयाला धार्मिक रंग देणे योग्य नसून हा कायदा देशभरात लागू करण्यात यावा, अशी मागणी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी केली. माझ्या मते गायी आणि म्हशींच्या हत्येवर बंदी घालण्यात आली पाहिजे. सध्या देशभरात ज्या कारणांसाठी गायी आणि म्हशींची कत्तल करण्यात येते, त्यापैकी ९० टक्के व्यवसाय हे अनधिकृत आहेत. कायद्यानेदेखील फक्त १४ ते १६ वर्षांवरील जनावरांची कत्तल करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, व्यवसायात फायदा मिळवण्यासाठी सर्रासपणे गर्भार किंवा दुभत्या गायींची कत्तल करण्यात येते, असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले.
या गोमांसाला निर्यातीसाठी मागणी असल्याने विक्रेतेदेखील जनावरे मोठी होण्याची वाट पाहत नाहीत. त्यांना फक्त वयाने कोवळी असणारीच जनावरे हवी असतात. देशभरातील दुग्ध उत्पादनावर या सगळ्याचा परिणाम झालेला तुम्हाला पहायला मिळेल.  त्यामुळे आपल्या देशात आता दुधच उरले नसल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले. यासाठी मनेका गांधी यांनी दोन वर्षापूर्वी प्रकाशित झालेल्या एका अहवालाचा दाखला दिला. देशातील एकूण दुग्ध उत्पादनापैकी ८० टक्के दूध हे भेसळयुक्त आहे. उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांमध्ये तर सर्वत्र अशाचप्रकारच्या दुधाचे वितरण होत असून जे काही शुद्ध स्वरूपातील दूध मिळते, तेदेखील प्रौढ जनावरांपासून मिळते.
गोवंश हत्याबंदीच्या निर्णयामागे कोणतेही धार्मिक कारण आहे का, असे विचारले असता, हा फक्त धार्मिक मुद्दा नसल्याचे मनेका यांनी सांगितले. हिंदू लोक खाटीकांना गायी किंवा म्हशी विकतात. त्यानंतर त्यांची वाहतूक करणारे ट्रकचालक ज्यामध्ये सरदारांसारख्या हिंदुंचा समावेश असतो ते या गायी-म्हशींना कशाहीप्रकारे गाडीत कोंबतात. बहुतांश खाटीक हे धर्माने मुसलमान असतात, परंतु हा त्यांच्या व्यवसाय आहे. तेव्हा, या निर्णयाला कोणत्याहीप्रकारे धार्मिक रंग देण्याची आवश्यकता नसल्याचे त्या म्हणाल्या.  

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ban on cow buffalo slaughter should be country wide maneka gandhi

ताज्या बातम्या