देशातील प्रदूषित शहरांमध्ये १ डिसेंबपर्यंत (३० नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत) फटाक्यांवर बंदी घालण्याचा महत्त्वाचा निर्णय राष्ट्रीय हरित लवादने सोमवारी दिला असून तो मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दररोज करोनाचे रुग्ण वाढत असून प्रदूषणामुळे परिस्थिती आणखी खराब होण्याचा धोका आहे. त्यामुळे फटाक्यांची विक्री तसेच वापराला मनाई करण्यात आल्याचे लवादाने आदेशपत्रात म्हटले आहे.

गेल्या नोव्हेंबरमध्ये ज्या शहरांमध्ये हवेचा गुणवत्ता निर्देशांक वाईट वा त्यापेक्षाही खालावलेला होता, तिथे फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी असेल. या शहरांमध्ये हरित फटाक्यांच्या वापराचीही मुभा देण्यात आलेली नाही. ज्या शहरांमध्ये हवेची गुणवत्ता मध्यम स्तरापर्यंत असेल, त्या शहरांमध्ये हरित फटाके उडवण्याचा आनंद घेता येईल. मात्र, त्यासाठी लवादाने दोन तासांची वेळ निश्चित केली आहे. दिवाळीमध्ये रात्री ८ ते १० या वेळेत फटाके उडवता येतील.

०-१०० निर्देशांकांपर्यंत प्रदूषणाचा स्तर कमी असतो व हवेची गुणवत्ता समाधानकारक मानली जाते. १०१-२०० मध्यम, २०१-३०० वाईट, ३०१-४०० अतिवाईट, ४०१ व त्यापेक्षा जास्त निर्देशांक हवेतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत गंभीर मानली जाते. लवादाच्या नव्या आदेशानुसार, हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०१-२०० दरम्यान असेल अशा शहरांमध्ये दोन तास हरित फटाके उडवता येतील. गुणवत्ता निर्देशांक त्यापेक्षा जास्त असेल अशा शहरांमध्ये फटाक्यांवर संपूर्ण बंदी असेल. दिल्लीत दिवाळीमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष आदर्श कुमार यांनी हा आदेश दिला.

राज्यांसाठी आदेश 

लवादाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचेही आदेश दिले. प्रदूषणामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यांनी प्रदूषण नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी. राज्यांचे मुख्य सचिव व पोलीस महासंचालकांनी लवादाच्या आदेशाच्या अंमलबजावणीसंदर्भात सर्व जिल्हाधिकारी व पोलीस जिल्हाप्रमुखांसाठी सूचनापत्र काढावे. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळांनी हवेतील प्रदूषणाच्या स्तरावर देखरेख ठेवावी व गुणवत्ता निर्देशांकाची अद्ययावत माहिती मंडळाच्या संकेतस्थळावर दिली जावी आणि त्यानंतर एकत्रित अहवाल लवादाला सादर करावा असे आदेशही देण्यात आले आहेत.

३१ डिसेंबरलाही नियम लागू

अन्य सण व उत्सवांच्या दिवशीही हा नियम लागू असेल. छट्टसाठी सकाळी ६ ते ८, ख्रिसमस व नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येला ३१ डिसेंबर रोजी रात्री ११.५५ ते मध्यरात्री १२.३० या वेळेत फटाके फोडता येतील. लवादाचा आदेश नोव्हेंबर महिन्यापुरता लागू असला तरी ३१ डिसेंबर रोजी फटाके उडावण्यावरील प्रतिबंधात्मक नियम लागू असेल. राज्य सरकारांनी फटाक्यांच्या वापरा संदर्भातील आदेश दिले नसतील तर लवादाचा आदेश आपोआप लागू होईल.

आरोग्याला अधिक महत्त्व

फटाक्यांची विक्री व वापरावरील निर्बंधांमुळे या व्यवसायावर तसेच रोजगारावर परिणाम होऊ शकेल पण फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण, त्याचा लोकांच्या आरोग्यावर होणारा दुष्परिणाम, पर्यावरणाची हानी याचाही विचार करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे आर्थिक नुकसानीचा विचार करण्यात आलेला नाही, असे लवादाने म्हटले आहे. सिक्कीम, राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, चंदिगढ या राज्यांमध्ये तसेच, केंद्रशासित प्रदेशांमध्ये सर्व प्रकारच्या फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. ९ ते ३० नोव्हेंबर या काळात फटाके उडवल्यास दीड ते ६ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते, असे दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय यांनी स्पष्ट केले.