तिरुवनंतपुरम : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने (पीएफआय) पुकारलेल्या केरळ बंददरम्यान विविध ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. अनेक गाडय़ा आणि दुकानांची तोडफोड करण्यात आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी देशभरात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ केरळ बंदची हाक देण्यात आली होती.

सकाळपासूनच पीएफआयचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागांमध्ये कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. एनआयए आणि केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी मोर्चे काढले. रास्ता रोको करून अनेक मार्ग अडवण्यात आले, तर दुकाने बळजबरीने बंद करण्यात येत होती. या वेळी दगडफेकीच्या घटना घडल्या. पोलिसांसह काही बस आणि ट्रकचालक, प्रवासी यात किरकोळ जखमी झाले. कोट्टायम जिल्ह्यात जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. कन्नूरमध्ये वाहनांवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. याखेरीज कोल्लम, कोझिकोड, वायनाड, इरोड, अलेप्पी इथेही हिंसाचाराच्या घटना घडल्या. बंददरम्यान राज्यभरातील अनेक शहरांमध्ये पीएफआयच्या शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

कार्यकर्त्यांना चोप: कन्नूरमध्ये बळजबरीने दुकाने बंद करण्यासाठी आलेल्या पीएफआय कार्यकर्त्यांना स्थानिकांनी चोपले. पय्यानूर शहरातील मध्यवर्ती बाजारात ही घटना घडली. बंदची सक्ती करणाऱ्या एकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. या वेळी मारहाण करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षांचे कार्यकर्तेही असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

न्यायालयाकडून दखल

पीएफआयने पुकारलेल्या केरळ बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराची केरळ उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली. आपण मनाई केली असताना बंद पुकारणे आणि त्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान खपवून घेतले जाणार नाही. आदेश मोडणाऱ्यांविरुद्ध राज्य सरकारने कडक कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले.