एका तरुणीचा बंगळुरू विमानतळाचा प्रवास अत्यंत भीतीदायक आणि थरारक अनुभवात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वारंवार विनंती करूनही कॅब ड्रायव्हरने कार थांबवण्यास नकार दिला. या संपूर्ण प्रसंगाचा व्हिडिओ पीडित तरुणीने इंस्टाग्रामवर शेअर केला असून, तो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेमकी घटना काय घडली?
पीडित तरुणी बंगळुरूहून पाटणा येथे जाण्यासाठी निघाली होती. विमानतळावर वेळेत पोहोचण्यासाठी तिने ‘रॅपिडो’ (Rapido) अॅपवरून एक एसी कॅब बुक केली. जेव्हा कॅब आली, तेव्हा तिच्या काचा काळ्या होत्या, जे भारतात बेकायदेशीर आहे. तरुणीला सुरुवातीलाच काहीतरी गडबड असल्याचा संशय आला, पण विमानाला उशीर होत असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले आणि ती गाडीत बसली.
प्रवास सुरू झाल्यावर तिने ड्रायव्हरला एसी सुरू करण्यास सांगितले. मात्र, ड्रायव्हरने उद्धटपणे नकार देत म्हटले की, तिने एसी कॅब बुक केलेली नाही. त्यावर तरुणीने सांगितले, “एसी सुरू आहे की नाही हा तुमचा प्रश्न आहे, माझा नाही.”
‘कोणालाही फोन कर, गाडी थांबणार नाही!’
वाद वाढल्याने तरुणीने ड्रायव्हरला गाडी थांबवून ट्रिप कॅन्सल करण्यास सांगितले. याच वेळी परिस्थिती हाताबाहेर गेली. ड्रायव्हरने थेट गाडी थांबवण्यास नकार दिला. तरुणीच्या म्हणण्यानुसार, ड्रायव्हर तिला म्हणाला, “गाडी थांबणार नाही. तू कोणालाही कॉल कर, कॅब थांबणार नाही!”
भरदिवसा दुपारी १२ वाजता घडलेल्या या प्रकारामुळे तरुणी प्रचंड घाबरली. ड्रायव्हरचे वर्तन पाहून तिने तात्काळ आपल्या मित्राला फोन केला, स्वतःचे लाइव्ह लोकेशन शेअर केले आणि पोलिसांना फोन करण्याची धमकी दिली. पोलिसांचे नाव ऐकताच ड्रायव्हर घाबरला आणि त्याने रस्त्याच्या मध्यभागी गाडी थांबवली. तरुणीने लगेच खाली उतरून रॅपिडो कस्टमर केअरशी संपर्क साधला आणि राईड कॅन्सल केली.
‘घाबरू नका, हिंमत दाखवा!’ तरुणीचे आवाहन
या घटनेनंतर तरुणीने व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. तिच्या वडिलांनी तिला हा व्हिडिओ पोस्ट न करण्याचा सल्ला दिला दिला होता, परंतु इतर महिलांच्या सुरक्षिततेसाठी तिने आवाज उठवण्याचे ठरवले. “अशा परिस्थितीत अजिबात घाबरू नका, शांत डोक्याने काम घ्या. नेहमी स्वतःच्या अंतर्मनाचा आवाज ऐका आणि गरज पडल्यास मोठ्याने ओरडून मदत मागा,” असे आवाहन तिने इतर मुलींना केले आहे.
सोशल मीडियावर तीव्र संताप
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी रॅपिडो कंपनी आणि ड्रायव्हरवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी तरुणीच्या धाडसाचे कौतुक केले आहे. एका युझरने लिहिले, “तुझा अभिमान वाटतो, तू परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे हाताळली.” तर दुसऱ्या युझरने अशा आपत्कालीन परिस्थितीत महिलांना प्रशासनाचे अधिकृत ‘११२’ अॅप वापरण्याचा सल्ला दिला आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
