Bangalore Capgemini creche abuse case: बंगळुरू येथील कॅपजेमिनी कंपनीच्या पाळणाघरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लहान मुलांना वॉशिंग मशीनमध्ये कोंडणे, पाण्याने भरलेल्या पाईप्समध्ये ढकलून देणे आणि स्वच्छतागृहात कोंडणे यासारखे अमानुष प्रकार पाळणाघरात केल्याचे प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बंगळुरू पोलिसांनी याप्रकरणी आता पाळणाघरातील पाच आयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाच आयांविरुद्ध गुन्हा

या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हा बालसंरक्षण कक्षाचे विधी व परिवीक्षा अधिकारी टिळकेश कुमार यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. एचएएल पोलीस ठाण्यात धमकी, बालकांचे लैंगिक व मानसिक शोषण/क्रूरता प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंद केला. यानंतर पोलिसांनी मंजुला, विजयलक्ष्मी, भवानी, सिंधू आणि बिंदू या पाच महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

लहान मुलांचा शारीरिक आणि मानसिक छळ

कॅपजेमिनीच्या ब्रुकफिल्ड कॅम्पसमध्ये बेबी केअर सुविधा आहे. येथे पाच महिलांवर पाळणाघरातील लहान मुलांची काळजी घेण्याची आणि त्यांच्या देखरेखीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पण, या महिलांनी मुलांची काळजी घेण्याऐवजी त्यांनी चिमुरड्यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. रडणाऱ्या मुलांना घाबरवण्यासाठी त्यांना चक्क वॉशिंग मशीनमध्ये कोंडणे, पाण्याने भरलेल्या पाईप्समध्ये ढकलून देणे, स्वच्छतागृहात कोंडणे अशी अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे. २५ जून रोजी हा प्रकार समोर आला.

पोलिस काय म्हणाले?

आयटी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ही मुले आहेत. ड्युटीवर असताना आपल्या मुलांना या पाळणाघरात सोडतात. पण, पाळणाघरात त्यांच्या मुलांना मिळालेली क्रूर वागणूक पाहून पालकांना धक्का बसला आहे, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने इंडियन एक्सप्रेसला दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती व्हाईटफिल्ड विभागाचे पोलीस उपायुक्त सैदुलू अदावत यांनी एक्सप्रेसला दिली आहे.

तक्रारदार काय म्हणाले?

तक्रारदार टिळकेश कुमार यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, “मला व्हॉट्सॲपवर काही व्हिडीओ आले होते, ज्यात पाळणाघरातील लहान मुले रडताना दिसत होती, त्यांच्यावर अत्याचार केले जात होते. हे दृश्य पाहून मी तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल केली.” दरम्यान, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कॅपजेमिनी कंपनीने तात्काळ हे पाळणाघर तात्पुरते बंद करण्यात आले आहे.