बंगळुरूमध्ये एका व्यावसायिकाने आपल्या २२ वर्षीय कर्मचाऱ्याची मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपल्या १९ वर्षीय मुलीबरोबर कर्मचारी घरात असल्याचं आढळल्यानंतर व्यावसायिकाने त्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी व्यावसायिक आनंदराज याला अटक केली आहे. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

मुलीबरोबर घरात आढळल्यानंतर केली मारहाण

मृत तरुणाचं नाव किरण असून तो मूळचा केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून तो आनंदराज यांच्या मालकीच्या उत्पादन कारखान्यात काम करत होता. प्राथमिक तपासानुसार, किरण आणि आपल्या मुलीमधील कथित संबंधांची माहिती आनंदराज यांना अलीकडेच मिळाली होती.

मंगळवारी सकाळी आनंदराज आणि त्यांची पत्नी घराबाहेर पडले. शेजारील शहरात शिक्षण घेत असलेली त्यांची मुलगी सुट्ट्यांसाठी बंगळुरूला आली होती. दिवसभर बाहेर जाणार असल्याचे सांगून दाम्पत्य घरातून निघाले. मात्र, काही तासांनंतर ते अचानक घरी परतले. त्यावेळी एका खोलीत किरण आणि त्यांची मुलगी एकत्र असल्याचे त्यांना दिसले.

पोलिसांच्या माहितीनुसार, किरणला मारहाण करण्यापूर्वी आनंदराज यांनी आपल्या मुलीला नातेवाईकांच्या घरी पाठवले. त्यानंतर त्यांनी किरणला मारहाण केली. या हल्ल्यात किरणला अनेक गंभीर दुखापती झाल्या आणि तो बेशुद्ध पडला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. रुग्णालय प्रशासनाने याबाबत पोलिसांना माहिती दिली.

हत्या पूर्वनियोजित होती का? पोलिसांकडून तपास

या हत्येचा पूर्वनियोजित कट असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मारहाण झाली त्यावेळी घरात आणखी कोणी उपस्थित होते का, याचाही तपास केला जात आहे.

दरम्यान, किरणचा मावसभाऊ प्रसाद यानेही ही हत्या आधीच नियोजन करून करण्यात आल्याचा दावा केला आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, आनंदराज यांनी किरणच्या भावाला आठवड्याच्या सुरुवातीला माल पोहोचवण्याच्या कामासाठी मुद्दाम उत्तर प्रदेशला पाठवले होते. त्यामुळे किरण घरात एकटाच असेल आणि मदतीसाठी कोणीही हस्तक्षेप करू शकणार नाही, असा त्यांचा हेतू होता, असा आरोप प्रसादने केला आहे. मात्र, किरणच्या भावाला उत्तर प्रदेशला पाठवण्यामागे खरोखरच हत्येचा कट होता का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या आरोपांची पडताळणी सुरू आहे.