बंगळुरू-मुंबई प्रवास आता अधिक वेगवान आणि आरामदायी होणार आहे. रेल्वे विभागाने बहुप्रतिक्षित बंगळुरू-मुंबई वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस सुरू करण्यास हिरवा कंदील दाखवला आहे. वाराणसी-नवी दिल्ली वंदे भारत स्लीपरनंतर रेल्वे मंत्रालयाकडून अवघ्या सात दिवसांत मिळालेली ही दुसरी मोठी मंजुरी आहे. चेन्नई येथील ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’च्या तंत्रज्ञानावर आधारित आणि ‘बीईएमएल’द्वारे निर्मित ही आकर्षक केशरी आणि राखाडी रंगाची रेल्वे लांब पल्ल्याच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.
दक्षिण पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जाणारी ही ट्रेन बंगळुरू ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान धावेल. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबरपासून ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
अवघ्या १६ तासांत गाठा मुंबई-बंगळुरू
सध्या मुंबई ते बंगळुरू दरम्यान धावणाऱ्या इतर गाड्यांना प्रवास पूर्ण करण्यासाठी २२ ते २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. मात्र, नवीन वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस हे अंतर अवघ्या १६ तासांत कापणार आहे. त्यामुळे ही या मार्गावरील सर्वात वेगवान ट्रेन ठरेल.
- ट्रेन क्रमांक: २७६५२ / २७६५१ (बेंगळुरू-मुंबई-बेंगळुरू)
- एकूण प्रवास वेळ: सुमारे १६ तास
मार्ग आणि प्रमुख थांबे
ही गाडी कलबुर्गी मार्गे धावणार असून प्रवासादरम्यान दोन्ही दिशांना ८ महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल.
हे आहेत ८ प्रमुख थांबे:
१. अनंतपूर
२. गुंतकल
३. रायचूर
४. यादगीर
५. कलबुर्गी
६. सोलापूर
७. पुणे<br>८. कल्याण</p>
वेळापत्रक काय?
ही ट्रेन आठवड्यातून ६ दिवस धावेल.
- बेंगळुरू ते मुंबई (ट्रेन क्र. २७६५२):
SMVT बेंगळुरू येथून दररोज रात्री १९:४५ वाजता (संध्याकाळी ७:४५) सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११:५५ वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल. (सोमवारी ही ट्रेन धावणार नाही). - मुंबई ते बेंगळुरू (ट्रेन क्र. २७६५१):
CSMT मुंबई येथून दररोज रात्री २०:१० वाजता (रात्री ८:१०) सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता SMVT बेंगळुरू येथे पोहोचेल. (मंगळवारी ही ट्रेन धावणार नाही).
वंदे भारत स्लीपरची खास वैशिष्ट्ये
- एकूण डबे: १६ (११ थ्री-टायर एसी, ४ टू-टायर एसी, १ फर्स्ट एसी)
- प्रवासी क्षमता: एकूण ८२३ प्रवासी (थ्री-टायर: ६११, टू-टायर: १८८, फर्स्ट एसी: २४)
- वेग: ताशी १८० किमी वेगाने धावण्याची क्षमता असलेली सेमी-हायस्पीड ट्रेन.
- आरामदायी बर्थ: सुधारित गाद्या आणि आधुनिक डिझाइनसह अत्यंत आरामदायी शयनयान.
- सुरक्षा व्यवस्था: अपघातांपासून संरक्षणासाठी स्वदेशी ‘कवच’ यंत्रणा आणि आपत्कालीन टॉक-बॅक सिस्टम.
- सुविधा: स्वयंचलित दरवाजे, आवाज नियंत्रण, उत्तम सस्पेंशन आणि जंतूनाशक तंत्रज्ञानासह उत्तम स्वच्छता व्यवस्था.
