बंगळुरू पोलिसांनी बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप असलेल्या २२ वर्षीय अस्मा खातूनला बेकायदा वास्तव्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले होते. तिच्यावर पुढील कारवाई म्हणून तिला देशातून हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू होती. मात्र, या प्रक्रियेदरम्यान पोलिसांसमोर वेगळेच आव्हान उभे राहिले. कारण अस्मा आठ महिन्यांची गर्भवती होती, त्यामुळे पोलिसांनी केवळ तिच्या ताब्याची जबाबदारी न निभावता तिच्या आरोग्याची, प्रसूतीची आणि नवजात बाळाचीही काळजी घेतली. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्स्प्रेसने दिले आहे.
‘ऑपरेशन मुक्त’अंतर्गत घेतले ताब्यात
अस्मा खातून ही रबिबुल बादशाची पत्नी असून, १७ जुलै रोजी तिला ‘ऑपरेशन मुक्त’अंतर्गत ताब्यात घेण्यात आले. बंगळुरूतील परप्पना अग्रहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ती बेकायदा राहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर तिला फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिसरसमोर हजर करण्यात आले. एफआरआरओच्या निर्देशानुसार तिला एका डिटेन्शन सेंटरमधील विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले.
गर्भवती महिलेची पोलिसांकडून विशेष काळजी
अस्माच्या प्रकरणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांनी तिच्या नियमित वैद्यकीय तपासण्या सुरू केल्या. तिला सरकारी रुग्णालयात सोनोग्राफी आणि इतर तपासण्यांसाठी नेण्यात येत होते. तिच्यासाठी सॅनिटरी पॅड, बाळासाठी लागणाऱ्या वस्तू आणि इतर आवश्यक साहित्याचीही व्यवस्था करण्यात आली.
परप्पन अग्रहारा पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक कलावती या स्वतः सहा महिन्याच्या गर्भवती आहेत. त्यांच्यावर अस्माची विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. “ती आठ महिन्यांची गर्भवती असल्याने आम्ही तिला नियमित तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात घेऊन जात होतो. तिच्यासोबत दररोज महिला पोलिस कर्मचारी असायच्या. आम्ही सर्वजणी आलटून-पालटून तिची काळजी घेत होतो,” असे कलावती यांनी सांगितले.
रुग्णालयातच दिला दुसऱ्या मुलीला जन्म
२४ ऑगस्ट रोजी अस्माला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. महिला पोलिस कॉन्स्टेबल चंद्रकला तिच्यासोबत रुग्णालयात गेल्या. तिला शिवाजीनगर येथील घोष हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे अस्माने दुसऱ्या मुलीला जन्म दिला. रुग्णालयात तपासणीदरम्यान अस्माला कांजिण्या झाल्याचेही पोलिसांना समजले. प्रसूतीनंतरही पोलिसांनी तिच्या आणि नवजात बाळाच्या गरजांकडे लक्ष दिले. २८ ऑगस्टपर्यंत ती रुग्णालयात होती. डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला बाळासह पुन्हा डिटेन्शन सेंटरमध्ये आणण्यात आले.
अवघ्या ९ दिवसांच्या बाळासह बंगालचा प्रवास
एफआरआरओच्या आदेशानुसार अस्मा, तिची चार वर्षांची मुलगी आणि नवजात बाळाला अखेर पश्चिम बंगालमधील मालदा येथे पाठवण्याची तयारी करण्यात आली. तेथून पुढील प्रक्रियेद्वारे त्यांना बांगलादेशात पाठवले जाणार होते. मात्र, बाळ अवघे नऊ दिवसांचे असल्याने बंगळुरूहून मालदापर्यंतचा प्रवास पोलिसांसाठी आव्हानात्मक होता, त्यामुळे महिला हेड कॉन्स्टेबल शीला यांना अस्मासोबत पाठवण्यात आले. पोलिसांनी प्रवासासाठी आई आणि बाळाच्या गरजेचे अन्न, कपडे तसेच नवजात बाळासाठी बेबी सूटची व्यवस्था केली.
‘बाळाची वेगळी काळजी घेतली’
३० ऑगस्ट रोजी अस्मा आणि तिच्या नवजात मुलीला बंगळुरू रेल्वेस्थानकावरून मालदासाठी रवाना करण्यात आले. बेगूर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश के. हेही एस्कॉर्ट पथकाचा भाग होते. “बाळाची स्वतंत्रपणे विशेष काळजी घेण्यात आली,” असे महेश यांनी सांगितले.
पोलिसांच्या माहितीनुसार, आई आणि बाळाचा प्रवास सुरक्षितपणे पूर्ण झाला. मालदा येथे पोहोचल्यानंतर त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
