बंगळुरूमध्ये इयत्ता ८ वीमध्ये शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शाळेत २० रुपये चोरल्याचा खोटा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला होता आणि शिक्षक माझ्यावर वारंवार ओरडले होते, असे तिने एका चिठ्ठीत नमूद केले आहे. या चिठ्ठीत तिने म्हटले आहे की, तिला हा अपमान सहन झाला नाही. तसेच तिने आपल्या कुटुंबीयांची चिठ्ठीतून माफीदेखील मागितली.

राहत्या घरी गळफास

ही घटना अनेकल तालुक्यात मारसूर येथे घडली. सरकारी उच्च प्रार्थमिक शाळेत ८ वीमध्ये शिकणाऱ्या या विद्यार्थिनीने गुरुवारी रात्री तिच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या कुटुंबियांना शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी सूर्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

२० रुपये चोरण्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर विद्यार्थिनीने एक चिठ्ठी मागे ठेवली होती; त्यात तिने नमूद केले होते की, शाळेत २० रुपये चोरल्याचा तिच्यावर चुकीचा आरोप करण्यात आला होता आणि या आरोपांमुळे ती दुखावली होती. शिक्षक तिच्यावर ओरडले होते आणि त्यातून झालेला आपला अपमान सहन झाला नाही, असेही तिने या चिठ्ठीत लिहिले होते.

चिठ्ठीत काय लिहिले…

चिठ्ठीमध्ये सदर विद्यार्थिनीने आत्महत्येपूर्वी आपण जगण्यास पात्र नाही आहोत असे लिहिले. तसेच तिने तिच्या आई, भावंडे आणि कुटुंबाची चिठ्ठीमधून माफी मागितली असून आईला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार धरू नये व हा निर्णय तिने स्वतः घेतला आहे असंही चिठ्ठीत नमूद केलं आहे.

या विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांनी सांगितले की, शाळेतील शिक्षकांमुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलले. तिच्या आईने माध्यमांना सांगितल्याप्रमाणे, “घरात तिला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता आणि जर असं असतं तर तिने मला सांगितलं असतं. उलट शाळेतील काही शिक्षकांमुळे ती त्रस्त होती. कोणते शिक्षक ते मात्र माहित नाही.”

त्याच दरम्यान विद्यार्थिनीच्या आईने सांगितले की, त्या त्वचारोगाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत्या. त्यांना मुलीच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांनी फोन करून दिली. पोलिसांनी सदर विद्यार्थिनीच्या हस्तलिखित चिठ्ठीचा तपास सुरू केला आहे. तसेच शाळेत नेमके काय घडले? शिक्षक तिला रागावले होते का? आणि कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमध्ये कितपत तथ्य आहे? याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.