बंगळुरू: कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये एका सर्वसामान्य नागरिकाने व्हीआयपी संस्कृती आणि पोलिसांच्या आडमुठ्या कारभाराविरोधात भर रस्त्यात आंदोलन केल्याची घटना समोर आली आहे. राज्यपालांच्या ताफ्यासाठी पोलिसांनी तब्बल अर्धा तास वाहतूक रोखून धरल्यामुळे, एका गर्भवती महिलेला घेऊन जाणारी कार ट्रॅफिक जॅममध्ये अडकली. यामुळे संतप्त झालेल्या पतीने थेट रस्त्यावरच ठिय्या मांडत पोलिसांना जाब विचारला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नेमकं काय घडलं?
रविवारी संध्याकाळी बंगळुरूमधील ओल्ड एअरपोर्ट रोडवर ही घटना घडली. कर्नाटकच्या राज्यपालांचा ताफा सुरक्षितपणे मार्गस्थ व्हावा यासाठी बंगळुरू ट्रॅफिक पोलिसांनी या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ३० मिनिटांसाठी रोखून धरली होती. या रस्त्यावर आधीच अंडरपासचे (भुयारी मार्ग) काम सुरू असल्याने नेहमीच मोठी कोंडी असते. त्यातच पोलिसांनी अचानक वाहतूक थांबवल्यामुळे काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि शेकडो प्रवासी अडकून पडले.
“माझी पत्नी गरोदर आहे…” पतीचा पोलिसांसमोरच टाहो
याच महाभयंकर ट्रॅफिक जॅममध्ये एका जोडप्याची कारही अडकली होती. कारमधील महिला गर्भवती होती आणि तिला तातडीने वैद्यकीय उपचारांची गरज होती. ट्रॅफिक पुढे सरकत नसल्याचे पाहून तिचा पती प्रचंड हताश झाला. अखेर संयम सुटल्याने तो कारमधून बाहेर पडला आणि बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांसमोरच रस्त्यावर ठाण मांडून बसला.
“सर, माझी पत्नी गरोदर आहे, तिला तातडीने डॉक्टरांकडे नेणे गरजेचे आहे,” असे ओरडून सांगत त्याने पोलिसांना जाब विचारला. एका सर्वसामान्य नागरिकाच्या वैद्यकीय आणीबाणीपेक्षा व्हीआयपी नेत्यांचा दौरा पोलिसांसाठी जास्त महत्त्वाचा आहे का? असा संतप्त सवाल त्याने उपस्थित केला. तिथून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. पोलिसांसमोर एकटा माणूस आपल्या हक्कासाठी आणि पत्नीच्या आरोग्यासाठी लढत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला आहे.
सोशल मीडियावर नेटकरी संतापले…
या घटनेनंतर बंगळुरूच्या वाहतूक व्यवस्थापनावर आणि व्हीआयपी संस्कृतीवर जोरदार टीका होत आहे. अरुंद आणि आधीच काम सुरू असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारे कोणत्याही पर्यायी व्यवस्थेशिवाय वाहतूक रोखणाऱ्या प्रशासनाला नागरिकांनी धारेवर धरले आहे.
एका संतप्त प्रवाशाने ‘X’ (पूर्वीचे ट्विटर) वर लिहिले की, “सर्वसामान्यांच्या सोयी-सुविधांना व्हीआयपींइतके महत्त्व कधी मिळणार? ओल्ड एअरपोर्ट रोडवर आधीच अंडरपासचे काम सुरू असल्याने रस्ता कोंडलेला असतो. अशात ३० मिनिटे वाहतूक पूर्णपणे ठप्प करणे म्हणजे निव्वळ असंवेदनशीलतेचा कळस आहे.”
स्थानिक नागरिकांनीही या आंदोलक पतीला पाठिंबा दिला आहे. राजकीय नेत्यांच्या दिमतीसाठी रुग्ण आणि सर्वसामान्यांच्या जीवाशी रोज खेळ केला जातो, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. राजकारण्यांच्या सुखासाठी सामान्यांचा जीव टांगणीला लावण्याची ही प्रथा कधी थांबणार? असा सवाल आता बंगळुरूचे नागरिक विचारत आहेत.
