जर तुम्हाला कोणी बँकॉक, फुकेत किंवा व्हिएतनामची मोफत ट्रिप आणि सोबत काही पैसे देण्याचे आमिष दाखवत असेल, तर सावध व्हा! तुम्ही अंमली पदार्थांच्या (ड्रग्ज) तस्करीच्या मोठ्या जाळ्यात अडकू शकता. सध्या मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईसारख्या मोठ्या विमानतळांवर सीमाशुल्क आणि ‘डीआरआय’ कडून कोट्यवधी रुपयांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त केला जात आहे. यामध्ये अनेक सामान्य पर्यटक आणि तरुण बळी पडत आहेत. याबाबतचे वृत्त ‘न्यूज१८’ या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.
काय आहे ‘हायड्रोपोनिक वीड’?
हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय, केवळ पोषक तत्वांनी युक्त पाण्यात आणि नियंत्रित तापमानात घरामध्ये पिकवला जाणारा गांजा. यामध्ये अंमली पदार्थांचे प्रमाण खूप जास्त असते. आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारात याची किंमत प्रचंड आहे. भारतीय विमानतळांवर पकडलेल्या साठ्यानुसार, १ किलो हायड्रोपोनिक गांजाची किंमत तब्बल १ कोटी रुपये आहे. त्यामुळे एका छोट्या ट्रॉली बॅगेतही १० ते १२ कोटींचे ड्रग्ज सहज लपवता येतात.
तस्करीची सोपी पद्धत तर टार्गेट कोण?
अंमली पदार्थांचे तस्कर हे सराईत गुन्हेगारांऐवजी सामान्य लोकांना लक्ष्य करत आहेत. बँकॉक ते मुंबई प्रवासाचे मोफत विमानाचे तिकीट, राहण्याचा खर्च आणि वरून २०,००० रुपये कमिशन दिले जाते. बदल्यात फक्त एक बॅग भारतात पोहोचवण्यास सांगितले जाते. पैशांची गरज असलेले तरुण, कॉलेज ड्रॉपआउट्स, बेरोजगार आणि महिलांना सोशल मीडियाद्वारे जाळ्यात ओढले जाते. परदेशात नवीन ‘मित्र’ बनून आधी विश्वास जिंकला जातो आणि नंतर “हा आमचा सामान किंवा गिफ्ट्स असलेला सुटकेस भारतात नेऊन द्या,” अशी गळ घातली जाते.
विमानतळांवर लागोपाठ कारवाया
नुकतीच मुंबई विमानतळावर एका २९ वर्षीय महिला बँक मॅनेजरला ११.८२ कोटींच्या हायड्रोपोनिक गांजासह अटक करण्यात आली. एका आठवड्यात मुंबईत तीन मोठ्या कारवाया झाल्या, ज्यात व्हिएतनाम आणि श्रीलंकन नागरिकांकडून कोट्यवधींचे ड्रग्ज पकडले गेले. थायलंडनंतर आता ‘व्हिएतनाम’ हे या ड्रग्जचे नवीन हब बनत आहे. ऑक्टोबर २०२५ मध्ये बंगळुरू विमानतळावर ‘कुटुंब’ म्हणून प्रवास करणाऱ्या ४ परदेशी नागरिकांकडून तब्बल ९४ कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला होता. यावर्षी मे आणि जून महिन्यातही येथे २६ कोटींहून अधिकचा साठा जप्त झाला आहे.
‘मला माहीत नव्हतं’ हा बचाव चालत नाही!
पकडलेले अनेक जण म्हणतात की, “बॅगेत गांजा आहे हे आम्हाला माहीत नव्हते.” मात्र, भारताच्या NDPS कायद्यानुसार हा बचाव चालत नाही. जर तुमच्या बॅगेतून ड्रग्ज सापडले, तर गुन्हेगार तुम्हीच मानले जाता आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी तुमची असते. कोर्ट अशा प्रकरणात थेट कोठडी सुनावते. त्यामुळे परदेशात नवीन व्यक्तीने दिलेली कोणतीही वस्तू, गिफ्ट किंवा बॅग स्वतःच्या सामानात ठेवू नका. विमानतळावर अनोळखी व्यक्तीकडून ‘पार्सल’ स्वीकारू नका. कोणतीही कंपनी किंवा व्यक्ती मोफत परदेश वारी आणि कमिशन देत असेल, तर तो १००% सापळा असू शकतो.
