Bangladesh : दुर्गापुजेतील हिंसाचारानंतर दुसऱ्या दिवशी इस्कॉनच्या मंदिराची नासधूस, एका भक्ताची जमावाकडून हत्या

शुक्रवारी रात्री इस्कॉनने सांगितले की बांगलादेशातील नोआखली येथे जमावाने त्याच्या मंदिरावर आणि भाविकांवर हिंसक हल्ला केला आहे

bangladesh After durga puja violence iskcon temple vandalised devotee killed
(फोटो सौजन्य- @iskcon/ट्विटर)

बांगलादेशातील दुर्गा पूजा मंडपावरील हल्ल्यानंतर शुक्रवारी अल्पसंख्याक हिंदू समुदाय आणि त्यांचे मुख्य धार्मिक स्थळ पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आले. नोआखलीमध्ये जमावाने इस्कॉन मंदिरावर हल्ला केला आणि त्याची जोरदार तोडफोड केली. तेथे उपस्थित असलेल्या भाविकांना मारहाणही केली. अनेक यात्रेकरूंची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, यामध्ये एका भक्ताची जमावाकडून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

नोआखली भागातील इस्कॉन मंदिराची कथितपणे तोडफोड करण्यात आली आणि जमावाने मंदिराच्या एका सदस्याची हत्या केली. शुक्रवारी रात्री इस्कॉनने सांगितले की बांगलादेशातील नोआखली येथे जमावाने त्याच्या मंदिरावर आणि भाविकांवर हिंसक हल्ला केला आहे. २०० पेक्षा जास्त लोकांच्या जमावाने इस्कॉनचे सदस्य पार्थ दास यांची हत्या केल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. इस्कॉनने सांगितले की त्याचा मृतदेह मंदिराशेजारी असलेल्या एका तलावात सापडला आहे

इस्कॉनच्या एका ट्विटमध्ये या हल्ल्याची माहिती देणारी भयानक चित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. “आज बांगलादेशच्या नोआखली येथे इस्कॉन मंदिर आणि भाविकांवर जमावाने हिंसक हल्ला केला. मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे आणि अनेक भाविकांची स्थिती गंभीर आहे. आम्ही बांगलादेश सरकारकडे हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची आणि दोषींना न्याय देण्याची मागणी करतो, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.

इस्कॉन मंदिराची तोडफोड होण्याआधी बांगलादेशात अनेक ठिकाणी दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले झाले आहेत. ज्यात किमान चार लोक मारले गेले आहेत. अनेक मंडपांमध्ये दुर्गा मूर्तींची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी दुर्गा पूजेच्या वेळी कमिला शहरात हिंसा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. हा हिंसाचार करणाऱ्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा केली जाईल, असे त्या म्हणाल्या.

काही अज्ञात व्यक्तींनी बांगलादेशात दुर्गा पूजेच्या उत्सवाच्या वेळी काही हिंदू मंदिरांचे नुकसान केले आणि सरकारला २२ जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दल तैनात करण्यास भाग पाडले. अहवालानुसार, बुधवारी कमिलाच्या सीमेला लागून असलेल्या चांदपूरच्या हाजीगंज उपजिल्ह्यात पोलिस आणि लोकांमध्ये झालेल्या चकमकीत तीन जण ठार झाले, तर दुसऱ्या व्यक्तीचा नंतर मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी हाजीगंजमध्ये रॅलीवर बंदी घातली आहे, जिथे अधिकाऱ्यांनी चार लोकांना गोळ्या घालून ठार केल्याची पुष्टी केली आहे. मुस्लिम बहुल बांगलादेशातील १६९ दशलक्ष लोकसंख्येपैकी १० टक्के लोक हिंदू आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bangladesh after durga puja violence iskcon temple vandalised devotee killed abn

Next Story
खोबऱ्याच्या तेलाचा वापर टूथपेस्टमध्ये करणे शक्य
ताज्या बातम्या