Eid sacrifice canceled Bangladesh Trump buffalo: गेल्या काही दिवसांपासून जगभरात बांगलादेशमधील एक म्हैस चांगलीच व्हायरल होत आहे. बांगलादेशमधील या दुर्मिळ अल्बिनो म्हशीला डोनाल्ड ट्रम्प असे नाव दिल्याने ती अधिकच प्रसिद्ध झाली. विशेष म्हणजे या म्हशीचा मध्यम सफेद रंग आणि माथ्यावर असणारे सोनेरी रंगाच्या केसांमुळे म्हैशीचे नाव ट्रम्प यांच्याशी जोडण्यात आले आणि जगभरात या म्हशीची चर्चा होऊ लागली. पण, व्हायरल झाल्यामुळेच या म्हशीचे प्राण वाचले असून, ईदच्या निमित्ताने तिची कुर्बानी देण्याचा निर्णय रद्द करण्यात आला.

बांगलादेशमधील म्हैस व्हायरल

जगभरात सर्वत्र ईद साजरी होत आहे, मुस्लिम बांधवांच्या या सणाला जनावरांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. बांगलादेशमध्ये दुर्मिळ अल्बिनो म्हशीला कुर्बानी देण्यात येणार होती. पण, ही म्हैस तिचा रंग आणि माथ्यावरील केसांमुळे चांगलीच व्हायरल झाली. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या लुकमुळे म्हशीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होऊ लागले. म्हशीचे टोपन नावही डोनाल्ड ट्रम्प असे ठेवण्यात आले आणि जगभरात त्याची चर्चा होऊ लागली. म्हैस व्हायरल झाल्यानंतर बांगलादेश सरकारने ईदच्या निमित्ताने तिची देण्याचा निर्णय अखेरच्या क्षणी रद्द केला.

सरकारकडून कुर्बानी रद्द

बांगलादेश सरकारच्या गृह मंत्रालयाने म्हशीची कुर्बानी रद्द केल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. ७०० किलो वजनाची दुर्मिळ अल्बिनो म्हैशीची कुर्बानीसाठी कत्तलखान्याला विक्री करण्यात आली होती. दरम्यान, म्हैस व्हायरल होताच प्रशासनाने याची दखल घेतली. लोकांची म्हैशीला पाहण्यासाठी होणारी गर्दी आणि म्हैशीची प्रसिद्धी लक्षात घेता सरकारने म्हशीची कुर्बानी रद्द केली. गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद यांनी म्हशीला जीवदान देण्याचे, म्हैस खरेदी करणाऱ्याला पैसे परत करण्याचे आणि म्हैस ढाका येथील राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात स्थलांतरित करण्याचे आदेश दिले, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

म्हशीला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

म्हैस व्हायरल झाल्यानंतर देशभरातून नागरिक म्हशीला पाहण्यासाठी म्हैस मालकाच्या फार्ममध्ये गर्दी करु लागले. सरकारने याची दखल घेतल्याचे गृहमंत्री सलाहुद्दीन अहमद म्हणाले. म्हशीला ट्रम्प नाव देण्याचे धाकट्या भावाने सुचवले अशी माहिती फार्मचे मालक झियाउद्दीन मृधा यांनी रॉयटर्सला दिली. म्हशीत साम्य आढल्यानंतर त्याला ही कल्पना सुचल्याचे मृधा सांगतात. अल्बिनो म्हैस बांगलादेशमध्ये अतिशय दुर्मिळ मानली जाते. दरम्यान, ही म्हैस डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी साम्य असल्यावरुन त्याच नावाने व्हायरल झाली आणि तिचे प्राण वाचले, अशी भावना व्यक्त केली जात आहे.