बांगलादेशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं असून राजधानी ढाक्यात भारताविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. ‘दिल्ली की ढाका? ढाका, ढाका’ अशा घोषणा देत हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. बांगलादेशातील वाढती महागाई, गंभीर वीज संकट आणि इंधन-गॅसच्या तुटवड्यामुळं पंतप्रधान तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनाच्या आडून पुन्हा एकदा भारताविरोधी राजकारणाचा खेळ सुरू झाल्याचे चित्र आहे. ‘इंडिया टूडे’ने या संदर्भातलं वृत्त दिलं आहे.

शुक्रवारी ढाक्यातील ‘नॅशनल म्युझियम’समोर ‘नॅशनल सिटीझन पार्टी’चे संयोजक नाहिद इस्लाम यांच्या नेतृत्वाखाली एक भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या वेळी नाहिद यांनी गृह आणि ऊर्जा मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला. मात्र, केवळ देशांतर्गत समस्यांपर्यंत मर्यादित न राहता या सभेत पुन्हा एकदा भारताला लक्ष्य करण्यात आलं.

भारताविरोधी घोषणांचा पुनरुच्चार

भारतावर बांगलादेशविरोधात कट रचल्याचा आरोप करत नाहिद इस्लाम म्हणाले, “सध्याचे सरकार बांगलादेशला भारताच्या षड्यंत्रांपासून वाचवू शकत नाही.” आपल्या भाषणात त्यांनी सीमावर्ती भागातील कथित हत्या, आसाम व पश्चिम बंगालमधील मुस्लिमांवर अत्याचार होत असल्याचा दावा केला. इतकेच नव्हे तर दिल्लीत मशिदी पाडण्याचे नियोजन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही.

या आंदोलनात जहाल विचारांचे खासदार हसनात अब्दुल्ला हेदेखील सहभागी झाले होते. हसनात यांनी गेल्या वर्षी भारताच्या ईशान्येकडील सात राज्ये भारतापासून तोडण्याची थेट धमकी दिली होती, ज्यावर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.

गंगा पाणी वाटप करारावरून भारताला इशारा

नाहिद इस्लाम यांनी १९९६ च्या गंगा पाणी वाटप करारावरूनही भारताला थेट इशारा दिला. “जर गंगा पाणी वाटप करारावर न्यायाने पुन्हा चर्चा झाली नाही, तर बांगलादेशची जनता पुन्हा रस्त्यावर उतरेल. या वेळी आम्ही आमच्या हक्काच्या पाण्यासाठी एक इंचही तडजोड करणार नाही,” असा पवित्रा त्यांनी घेतला.

  • भारत आणि बांगलादेश दरम्यानचा ३० वर्षांचा ऐतिहासिक गंगा पाणी वाटप करार या वर्षी डिसेंबरमध्ये संपत आहे.
  • बांगलादेशच्या जलसंपादनेने १२ डिसेंबरपूर्वी नवीन करारावर स्वाक्षरी व्हावी यासाठी दबाव वाढवला आहे.
  • बांगलादेशात गंगेला ‘पद्मा’ म्हणून ओळखले जाते, जी तेथील जीवन वाहिनी मानली जाते. देशातील सुमारे एक तृतीयांश लोकसंख्या उपजीविकेसाठी या नदी प्रणालीवर अवलंबून आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर बांगलादेशात भारतविरोधी भावना भडकावण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.यापूर्वी खासदार हसनात अब्दुल्ला यांनी “बांगलादेशात अस्थिरता निर्माण झाल्यास त्याची झळ सीमेपलीकडेही पोहोचेल. आमच्या देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्यांना जर तुम्ही आश्रय देणार असाल, तर आम्हीही सात राज्यांतील फुटीरतावाद्यांना आश्रय देऊ.” ही धमकी दिली होती.

त्याचप्रमाणे जमात-ए-इस्लामीचे माजी प्रमुख गुलाम आझम यांचे पुत्र आणि निवृत्त ब्रिगेडियर जनरल अब्दुल्लाहील अमान आझमी यांनी तर “जोपर्यंत भारताचे तुकडे होत नाहीत, तोपर्यंत बांगलादेशात कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित होऊ शकत नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. फेब्रुवारी २०२६ मध्ये तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील ‘बांगलादेश नॅशनल पार्टी’ सरकार सत्तेवर आल्यानंतर अशी विधाने काही प्रमाणात कमी झाली होती. मात्र, आता देशांतर्गत आर्थिक संकट गडद होताच पुन्हा एकदा भारताविरोधी कार्ड वापरले जात आहे.

‘एका हुकूमशहाला घालवलं, आता नवा हुकूमशहा उगवतोय’

नाहिद इस्लाम यांनी थेट पंतप्रधान तारिक रहमान यांच्यावर निशाणा साधत म्हटले, “तारिक रहमान लंडनहून बांगलादेशात भ्रष्टाचार, लूटमार, वसुली आणि दहशत पसरवण्याचा प्लॅन घेऊन आले आहेत. आम्ही एका हुकूमशहाला हाकलून दिले आणि आता देशात नव्या हुकूमशहाचा उदय होत आहे. आम्ही या नव्या हुकूमशहाचाही पराभव करू.”

थोडक्यात सांगायचे तर, बांगलादेशातील हे आंदोलन प्रामुख्याने तेथील देशांतर्गत महागाई आणि प्रशासकीय अपयशाविरुद्ध असले, तरी राजकीय स्वार्थासाठी भारताला मध्ये ओढून भारतविरोधी भावना भडकावण्याचा जुनाच प्रयत्न तेथे पुन्हा एकदा सुरू झाला आहे.