पीटीआय, नवी दिल्ली – थकबाकी न भरल्यामुळे बांगलादेशने स्पाइसजेट या विमान कंपनीला आपल्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास बंदी घातल्याची माहिती सूत्रांनी दिली. बांगलादेशचे हवाई क्षेत्र उपलब्ध नसल्याने कोलकात्यातून सुटणाऱ्या काही उड्डाणांसाठी, विशेषतः गुवाहाटीकडे जाणाऱ्या विमानांसाठी, कंपनीला लांब मार्गांचा अवलंब करावा लागत आहे.

याबाबत संपर्क साधला असता स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी गुरुवारी सांगितले की, नेव्हिगेशन शुल्कासह कार्यपद्धती व अंमलबजावणीसंबंधित मुद्द्यांवर संबंधित अधिकाऱ्यांशी कंपनीची नियमित चर्चा सुरू आहे. ‘हे विमान उद्योगातील नेहमीचे प्रश्न असून लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही सकारात्मक पद्धतीने काम करत आहोत. आमची उड्डाण सेवा सुरळीत सुरू असून नियामक अटींनुसार नियोजित सेवा सुरूच आहेत,’ असे त्यांनी निवेदनात म्हटले.

थकबाकीचे नेमके स्वरूप स्पष्ट झाले नसले तरी देयके न भरल्यामुळेच बांगलादेशने ही बंदी घातल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी बांगलादेश नागरी विमान प्राधिकरणाला पाठवलेल्या ईमेलला तत्काळ प्रतिसाद मिळाला नाही.

दरम्यान, फ्लाइटरडार२४ च्या आकडेवारीनुसार गुरुवारी कोलकाता–गुवाहाटी आणि कोलकाता–इम्फाळ या मार्गांवरील स्पाइसजेटची विमाने बांगलादेशच्या हवाई क्षेत्राचा वापर न करता पर्यायी व लांब मार्गांनी प्रवास करत असल्याचे दिसून आले. दुपारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारवर स्पाइसजेटचा शेअर सुमारे १ टक्क्यांनी घसरला. गेल्या आठवड्यात स्पाइसजेटने डिसेंबर २०२५ अखेरच्या तिमाहीत वाढत्या खर्च व एकरकमी खर्चामुळे २६९.२७ कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता.