scorecardresearch

VIDEO: बांगलादेशमध्ये लपला आणि थेट मलेशियात बाहेर पडला; असला लपाछपीचा खेळ कधी पाहिलीये का?

बांगलादेशमधील १५ वर्षांचा फहीम लपाछपीचा खेळ खेळत असताना शिपिंग कंटेनरमध्ये लपला होता.

bangladesh boy playing hide and seek
मजा म्हणून लपायला गेला आणि कंटनेरमध्येच फसला

लहान असताना अनेकांनी लपाछपाची खेळ एकदा तरी खेळलेला असतो. जगातील सर्वच देशांमध्ये लहान वयात खेळला जाणारा हा एक लोकप्रिय खेळ आहे. मजा म्हणून खेळल्या जाणाऱ्या या खेळामुळे कधीकधी खूप विचित्र घटना घडतात. खेळ कोणताही असो, काळजीपूर्वक खेळला गेला पाहीजे. अन्यथा अनर्थ घडू शकतो. बांगलादेशच्या एका १५ वर्षीय मुलाबसोबत असाच काहीसा प्रकार घडला आहे. बांगलादेशच्या चटगांव येथे काही मुले लपाछपीचा खेळ खेळत होते. यावेळी एका मुलाने लपण्यासाठी बंदरावर उभ्या असलेल्या शिपिंग कंटेनरची जागा निवडली आणि तिथेच तो अडचणीत सापडला. आपण लपण्यासाठी निवडलेली जागा आपल्याला संकटात नेणार आहे, याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती.

बांगलादेशमधील ११ जानेवारीची ही घटना आहे. लपाछपी खेळत असताना १५ वर्षांचा फहीम रेल्वेच्या शिपिंग कंटेनरमध्ये जाऊन लपला. त्यावेळी त्याला कल्पना नव्हती की त्याच्यासोबत पुढे काय होईल. कंटेनरमध्ये लपल्यानंतर फहीमला कंटेनरमधून बाहेर पडता आले नाही. ११ जानेवारीला हे शिपिंग कंटेनर आपल्या नियोजित प्रवासाला निघालं आणि १७ जानेवारी रोजी मलेशियाच्या पोर्ट क्लांग येथे पोहोचलं. तब्बल सहा दिवसांच्या प्रवासानंतर फहीम देखील कंटेनरसोबत मलेशियाला पोहोचला होता. या दरम्यान न खाता-पिता तो कंटेनरमध्येच होता. जेव्हा कंटेनरमधून त्याला बाहेर काढण्यात आलं तेव्हा त्याने त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

मलेशियाच्या बंदरावर पोहोचल्यानंतर फहीमला बाहेर काढले गेले. त्याने सांगितले की, सहा दिवस तो कंटेनरच्या बाहेर पडण्यासाठी धडपड करत होता. त्याने अनेकवेळा कंटेनरवर लाथा मारल्या. जोरजोरात ओरडला. मदतीसाठी याचना केली. मात्र त्याच्या मदतीला कुणीही आले नाही. जेव्हा त्याला कंटेनरच्या बाहेर काढले तेव्हा फहीम खूप घाबरलेला होता. सहा दिवस उपाशी राहिल्यामुळे भूकेने अतिशय व्याकूळ झालेल्या फहीमला बंदरावरील कर्मचाऱ्यांनी खायला दिले.

फहीमला सुरक्षित बांगलादेशला पाठविले

या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मलेशियाच्या बंदरावरील कर्मचाऱ्यांना सुरुवातील हे प्रकरण मानवी तस्करीचे वाटले होते. मलेशिया पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केल्यानंतर त्यांना तथ्य समजले. मलेशियाचे गृहमंत्री दातुक सेरी सैफुद्दीन यांनी माध्यमांना बोलताना या मुलाची माहिती दिली. तसेच त्याच्यावर उपचार करुन त्याला सुरक्षित पुन्हा बांगलादेशला पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 09:28 IST