Bangladesh Bus Accident Video Padma River: बांगलादेशमध्ये प्रवासी बस नदीत कोसळून २३ जणांचा मृत्यू झाला आहे तर, अनेकजण बेपत्ता आहेत. फेरीतून बस पदमा नदीत कोसळून हा अपघात झाला. बसमध्ये जवळपास ५० प्रवासी होते, अशी माहिती समोर आली आहे. बुधवारी सायंकाळी ही अपघाताची घटना घडली. बेपत्ता प्रवाशांचा बचावकार्य पथकाच्या मदतीने शोध घेतला जात असल्याचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केले आहे.

अपघाताबाबत पोलिसांनी काय सांगितले?

“आम्ही आत्तापर्यंत २३ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. अद्याप अनेक प्रवासी बेपत्ता आहेत. काही प्रवाशांना वाचविण्यात यश आले आहे. रात्र झाल्यानंतर अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले. दिवसा पुन्हा बचावकार्य सुरु करण्यात येईल. अश्निशामक दल, नौदल, पोलिस आणि स्वंयसेवी संस्थांच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे”, अशी माहिती पोलिस अधिकारी रसेल मोल्ला यांनी एएनआयला दिली.

बसमध्ये होते जवळपास ५० प्रवासी

वृत्ताच्या माध्यमातून समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, बुधवारी सांयकाळी पाच वाजताच्या सुमारास राजबारी ते ढाका जाणारी प्रवासी बस पदमा नदीच्या फेरीवर आली. तिसऱ्या टर्मिनलवरुन बस पाण्यात कोसळली यावेळी बसमध्ये एकूण ५० प्रवासी होते असे सांगितले जात आहे. राजबारी ते ढाका हे अंतर जवळपास १२८ किलोमीटर असल्याचे समजते. 

व्हिडीओ समोर

फेरीवरुन बस पाण्यात कोसळत असतानाचा एक व्हिडीओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. बस कोसळताना सभोवताली असणाऱ्या नागरिकांची धावपळ दिसत आहे. तर, बस नदीत कोसळल्यानंतर काही प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत करताना नागरिक दिसत आहेत.

रात्री उशिरापर्यंत बचावकार्य

दुसऱ्या एका जहाजाच्या मदतीने पाण्यात बुडालेली बस बाहेर काढण्यात आली, असे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांनी दिले आहे. रात्री उशिरा १२ वाजेपर्यंत घटनास्थळी बचावकार्य सुरु होते. दरम्यान, अंधार झाल्याने बचावकार्य थांबविण्यात आले. मृत प्रवाशांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी टाहो फोडला. बेपत्ता प्रवशांचा अद्याप शोध घेतला जात असल्याचे स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटले आहे. तर, सुदैवाने काही प्रवासी यातून बचावले आहेत.