Bangladesh Crisis: बांगलादेशात हिंसाचाराच्या घटना अद्यापही सुरु आहेत. हिंसाचाराच्या घटनानंतर शेख हसीना यांनी ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान पदाचा राजीनामा देत देश सोडला. त्यानंतर बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वात अंतरिम सरकार स्थापन झालं. पण यानंतरही बांगलादेशमधील परिस्थिती पूर्व पदावर आलेली दिसत नाही. या राजकीय गोंधळात अल्पसंख्याक हिंदूंवर सर्वाधिक अत्याचार होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. त्यामुळे शेकडो बांगलादेशी भारतात येण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीनंतर भारत बांगलादेशच्या सीमेवर सतर्कता वाढवण्यात आलेली आहे. बांगलादेशमधील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार होत असल्याच्या घटना समोर आल्यानंतर काही लोकांनी सीमा ओलांडून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र. शेकडो बांगलादेशी नागरिकांचा हा प्रयत्न बीएसएफने रोखला. याबाबतचा एक व्हिडीओ समोर आला असून भारतात प्रवेश करु इछिणाऱ्या प्रयत्नात असलेल्या लोकांना भारताच्या बीएसएफ जवानाने कशा प्रकारे समजावलं हे इंडियन एक्सप्रेसने शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. हेही वाचा : Bangladesh Chief Justice Resign : शेख हसीना यांच्यानंतर आता बांगलादेशच्या सरन्यायाधीशांचा राजीनामा; पद सोडण्यासाठी आंदोलकांनी दिला होता इशारा दरम्यान, व्हिडीओमध्ये जवान असे म्हणताना दिसत आहेत की, "माझे लक्षपूर्वक ऐका. आरडाओरडा करून काहीही होणार नाही. तुम्हा सर्वांना सध्या भेडसावत असलेल्या समस्यांसंदर्भात आम्हाला कल्पना आहे. त्यावर चर्चा केली पाहिजे. मात्र, आम्ही अशा समस्या सोडवू शकत नाहीत. आम्ही तुम्हाला सीमा ओलांडण्याची परवानगी देऊ शकत नाही", असं बीएसएफ जवानाने म्हटलं आहे. तसेच बीएसएफचे जवान त्यांची समजूत काढत कोणत्याही देशात बेकायदेशीरपणे प्रवेश करणं हा गुन्हा असल्याचं त्यांना सांगत असल्याचं दिसत आहे. तसेच या विषयावर चर्चा होणं आवश्यक आहे. मात्र, आम्ही तुम्हाला सीमेवरील सर्व लोकांना परत जाण्याचे आवाहन करतो, असंही म्हटलं आहे. दरम्यान, बांगलादेशातून स्थलांतर पाहता भारत आणि बांगलादेश सीमेवर गेल्या काही दिवसांपासून हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारच्या सूचना काय? बांगलादेशमधील उसळलेल्या हिंचाराच्या घटनानंतर केंद्र सरकारने भारत आणि बांगलादेश सीमेवर गेल्या काही दिवासंपासून अलर्ट जारी केलेला आहे. याबाबत शेजारील देशातून कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे येण्याची परवानगी देऊ नये, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या असल्याचं पोलीस महासंचालक जी पी सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच भारतीय पासपोर्ट धारक, विद्यार्थी आणि व्यापारी, जर त्यांची कागदपत्रे योग्य पडताळणीनंतर वैध आढळली तर त्यांना प्रवेश करण्यास परवानगी दिली जाईल, असंही जी पी सिंग यांनी स्पष्ट केलं आहे.