Bangladesh Crisis Sheikh Hasina : बांगलादेशमधील अराजकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शिक्षण व नोकऱ्यांमधील आरक्षणाविरोधात विद्यार्थ्यांनी महिनाभरापूर्वी सुरू केलेलं आंदोलन हिंसक झालं आहे. दरम्यान, देशाची परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर शेख हसीना यांनी पतंप्रधानपदाचा राजीनामा दिला. पाठोपाठ त्यांनी बांगलादेशमधून पलायन केलं. दरम्यान, महिनाभरापूर्वी सुरू झालेलं हे आंदोलन थांबवण्यासाठी, या आंदोलनाच्या नावाखाली होणारी हिंसा रोखण्यासाठी शेख हसीना यांच्या सरकारने अनेक प्रयत्न केले होते. या काळात शेकडो तरुणांना अटक देखील केली होती. विद्यार्थ्यांचा उठाव व हिंसक आंदोलनादरम्यान, पोलिसांनी शेकडो आंदोलकांना अटक करण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी मदत मिळावी यासाठी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) कार्यकर्त्यांवर दबाव टाकला होता. काही कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की "आम्ही पोलिसांना आंदोलकांची नावं सांगावी, त्यांची माहिती द्यावी यासाठी पोलिसांनी आमचा छळ केला." तुरुंगातून बाहेर आलेल्या दोन बीएनपी कार्यकर्त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला त्यांची आपबिती सांगितली. ढाक्यातील तुरुंगातून बाहेर आलेल्या निजामुद्दीन मिंटो व झाकीर हूसैन यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. मिंटो व हुसैन म्हणाले, २२ जुलै रोजी रात्री १२.३० वाजता पोलिसांचा एक समूह साध्या कपड्यांमध्ये माझ्या घरी आला. त्यांनी आमच्यावर बंदूक रोखून धरली. एका पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला सांगितलं की आम्ही तुम्हाला अटक करत आहोत. तसेच ते लोक आम्हाला जीवे मारणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आम्ही अनेक पोलिसांना मारल्याचा त्यांनी आरोप केला होता. पोलिसांनी आधीच २५ तरुणांना ठार मारलं असून आमचा २६ व २७ वा नंबर असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. हे ही वाचा >> Junior Doctor’s Death : अर्धनग्न अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला डॉक्टरचा मृतदेह; सरकारी रुग्णालयात तरुणीची निर्घृण हत्या! "आम्हाला बेड्या ठोकल्या, वीजेचे झटके दिले" मिंटो म्हणाला, पोलिसांनी आम्हाला आमच्या घरातून बाहेर काढलं व १४ सीट्स असलेल्या एका बसमध्ये कोंबलं. आमच्या आजूबाजूला १८ ते २० सशस्त्र पोलीस कर्मचारी होते. बसमध्ये बसवल्यानंतर त्यांनी आम्हाला बेड्या ठोकल्या. तसेच त्यांनी आम्हाला आंदोलकांचा ठावठिकाणा विचारण्यास सुरुवात केली. आम्ही सुरुवातीला काही बोललो नाही. त्यामुळे त्यांनी आम्हाला वीजेचे झटके देण्यास सुरुवात केली. हे ही वाचा >> Vinesh Phogat Rajyasabha Seat: फक्त ४ दिवसांच्या फरकामुळे विनेश फोगटला राज्यसभा उमेदवारीचीही हुलकावणी; वाचा नियम काय सांगतो! पोलिसांनी आमचा खूप छळ केला मिंटो म्हणाला, पोलीस आम्हाला त्याच बसमधून बुरीगंगा नदीवरील पोस्टोगोला पुलावर घेऊन गेले. त्यांनी आम्हाला बसमधून उतरून पुलाच्या रेलिंगवर उभं राहण्यास सांगितलं. त्यांनी आम्हाला दोन पर्याय दिले. कमीत कमी दोन आंदोलकांना अटक करण्यासाठी त्यांची मदत करावी किंवा मृत्यू स्वीकारायचा. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आंदोलकांना पकडण्यासाठी तुमची मदत करू. त्यानंतर आम्हाला ढाक्यातील मालीबाग येथील सीआयडीच्या मुख्यालयात नेलं. तिथे आम्हाला एका कोठडीत डांबलं. कोठडीत आमच्याबरोबर इतर पाच जण होते. दिवसातून तीन ते चार वेळा आमच्याकडे आंदोलकांची चौकशी केली जात होती. यादरम्यान पोलीस आमचा आतोनात छळ करत होते. आम्हाला मारझोड करायचे.