Bangladesh Crisis Defence Expert Ranjit Borthakur : बांगलादेशमध्ये अराजकता माजली आहे. दिवसेंदिवस देशातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. आपल्या शेजारच्या देशातील परिस्थिती पाहता भारतही सतर्क आहे. तिथली कायदा आणि सूव्यवस्थेची स्थिती पाहता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) भारत-बांगलादेश सीमेवर हाय अलर्ट जारी केला आहे. बीएसएफचे महासंचालकही सीमेवर तळ ठोकून बसले आहेत. भारत आणि बांगलादेशची सीमा ४,०९६ किलोमीटरपर्यंत पसरली आहे. या संपूर्ण सीमेवरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. बीएसएफने बांगलादेश सीमेवरील सर्व चौक्या आणि सैन्यतळांना अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, संरक्षण तज्ज्ञ निवृत्त ब्रिगेडियर रणजीत बोरठाकूर यांनी बांगलादेशमधील सद्यस्थितीवर मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, बांगलादेशमध्ये सध्या जे काही घडतंय ते भारतासाठी खूप चिंताजनक आहे. बोरठाकूर यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, बांगलादेशमध्ये जे काही घडलं, प्रामुख्याने काल जे घडलं ते पाहता आपल्यासाठी हा चिंतेचा विषय आहे. शेख हसीना या देश सोडून पळून गेल्या असं मी म्हणणार नाही, कारण त्या बांगलादेशी वायूसेनेच्या मदतीने भारतात आल्या. त्यांना बांगलादेशी लष्कराची मदत मिळाली. भारतासमोरल धोक्यांबद्दल बोलायचं झाल्यास सध्या बांगलादेशमधील परिस्थिती आपल्यासाठी चिंतेचा विषय आहे. सर्व शेजारील राष्ट्रांपैकी त्यातल्या त्यात आपले चांगले संबंध हे बांगलादेशबरोबर आहेत. मात्र तिथे सत्तांतर झाल्यास नवी समीकरणं तयार होतील. ईशान्य भारतात दहशतवादी कारवाया करणाऱ्या कट्टरपंथी संघटनांचे प्रमुख तळ हे बांगलादेशमध्ये होते. मात्र शेख हसीना सत्तेवर आल्यानंतर त्यांनी या दहशतवादी संघटनांचा बंदोबस्त केला होता. रणजीत बोरठाकूर म्हणाले, हंगामी सरकारमध्ये जमात-ए-इस्लामी आणि बांगलादेश नॅशनल पार्टीमधील (बीएनपी) लोक सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. हे भारतविरोधी पक्ष आहेत. बीएनपीच्या मागील सरकारच्या काळात बांगलादेशमध्ये अनेक दहशतवादी संघटनांनी मोठे तळ तयार केले होते. जमात-ए-इस्लामी हा पक्ष बांगलादेशमध्ये प्रामुख्याने आसाम, मेघालय आणि त्रिपुरा या राज्यांना लागून असलेल्या सीमा भागात कट्टरपंथी लोकांच्या धार्मिक कट्टरतावादी उपक्रमांना प्रोत्साहन देत आला आहे, कट्टरतावादी लोकांच्या विघातक कृती पाठिशी घालत आला आहे. हे ही वाचा >> Bangladesh Violence : दहशतवाद्यांसह ५०० कैदी बांगलादेशच्या तुरुंगातून फरार, भारताची चिंता वाढली? पाकिस्तान व चीनवर संशय? निवृत्त ब्रिगेडियर रणजीत बोरठाकूर म्हणाले, बांगलादेशमधील हिंदू नागरिकांवर हल्ले झाल्यास ते लोक सीमा ओलांडून भारतात येऊ शकतात. बांगलादेशमधील हिंदू नागरिक आपल्याकडे शरणार्थी म्हणून येऊ शकतात. बांगलादेशमध्ये भारतविरोधी संघटना, हिंदूविरोधी संघटना आहेत, त्यांनी डोकं वर काढलं तर आपल्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. तिथे जे काही घडतंय किंवा गेल्या महिनाभरातील घटनाक्रम पाहिल्यास यामधील चीनचा हस्तक्षेप किंवा प्रभाव तपासण्याची आवश्यकता आहे. काही लोकांच्या मते यात पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयची मोठी भूमिका आहे.