नवी दिल्ली : बांगलादेशातील हिंसक घडामोडी व बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीची माहिती परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांत दिली. देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर संपूर्ण देश एकत्र असून बांगलादेशासंदर्भात केंद्र सरकारकडून घेतल्या जाणाऱ्या निर्णयाला व धोरणांना पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाही सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधी पक्षनेत्यांनी सरकारला दिली. बैठकीनंतर परराष्ट्रमंत्र्यांनी ‘एक्स’वरून सर्व पक्षांनी एकमताने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. संसदेच्या दोन्ही सभागृहांतील निवेदनापूर्वी केंद्र सरकारने मंगळवारी संसदेमध्ये सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. बैठकीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तीन महत्त्वाचे प्रश्न विचारले. बांगलादेशांसंदर्भात केंद्र सरकारचे अल्पकालीन व दीर्घकालीन धोरण काय असेल असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर, तेथील परिस्थिती अस्थिर आहे. परिस्थिती बदलेल त्यानुसार यासंबंधी धोरणही निश्चित केले जाईल, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले. बांगलादेशातील राजकीय अस्थिरतेचा अंदाज केंद्र सरकारला आधीच आला होता की, नंतर त्याची माहिती केंद्र सरकारपर्यंत पोहोचली, असेही राहुल गांधींनी विचारले. त्यावर, परराष्ट्रमंत्र्यांनी स्पष्ट उत्तर दिले नाही. हेही वाचा >>> ‘जातीय संसद’ विसर्जित; बांगलादेशात नव्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा; हिंसाचारात ४४० ठार संसदेच्या सभागृहांमध्ये विरोधी पक्षांकडून चर्चेची मागणी होऊ नये तसेच, परराष्ट्र धोरणाबाबत जाहीरपणे मतभेद चव्हाट्यावर येऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून मंगळवारी दक्षता घेण्यात आली. बैठकीला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्यमंत्री व राज्यसभेतील गटनेते जे. पी. नड्डा, संसदीय कामकाजमंत्री किरेन रीजिजू उपस्थित होते. विरोधी पक्षांमध्ये काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, सप, राजद, द्रमुक आदी पक्षांचे गटनेते उपस्थित होते. या बैठकीला आपला निमंत्रण देण्यात आले नव्हते. त्याबद्दल आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी निषेध केला. पाकिस्तानच्या संभाव्य सहभागाविषयी चर्चा बांगलादेशातील अराजकामागे पाकिस्तानचे कारस्थान आहे का, या प्रश्न राहुल गांधी यांनी उपस्थित केल्याचे समजते. त्यावर, यासंदर्भात आत्ताच ठोसपणे काही सांगता येणार नाही. सर्व घडामोडींची सरकार माहिती घेतली जात आहे. तिथल्या अराजकाचे समर्थन करणारी छायाचित्रे पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी त्यांचा समाजमाध्यमांवर अपलोड करत आहेत हे मात्र खरे. त्यांच्या या छायाचित्रांमागे तिथली बदलती परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न आहे की, अन्य कारणे आहेत याची चौकशी केली जात असल्याचे जयशंकर यांनी विरोधी पक्षनेत्यांना बैठकीमध्ये सांगितल्याचे समजते.