पीटीआय, ढाका
हिंसाचाराच्या काही तुरळक घटनावगळता बांगलादेशमध्ये गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. १३व्या संसदीय निवडणुकांबरोबरच ८४ कलमी सुधारणा संचावर सार्वत्रिक जनमतदेखील घेण्यात आले. निवडणूक आयोगाचे वरिष्ठ सचिव अख्तर अहमद यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी २ वाजेपर्यंत देशभरात सुमारे ४८ टक्के मतदानाची नोंद झाल्याचे सरकारी वृत्तसंस्था ‘बीएसएस’ने म्हटले आहे. या निवडणुकीची शुक्रवारी मतमोजणी होणार आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये ‘अवामी लीग’ सरकार कोसळल्यानंतर नवीन सरकार निवडण्यासाठी बांगलादेशमधील जनतेने गुरुवारी महत्त्वपूर्ण सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केले. देशभरातील ३०० पैकी २९९ संसदीय मतदारसंघांमध्ये कडक बंदोबस्तात सकाळी ७:३० वाजता मतदानाला सुरुवात झाली आणि दुपारी ४:३० वाजेपर्यंत ते सुरू राहिले. एका उमेदवाराचा मृत्यू झाल्यामुळे त्या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्यात आली. ज्या ठिकाणी मतदार केंद्राच्या आत होते, त्यांना मतदान पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली. अनेक ठिकाणी मतमोजणीला आधीच सुरुवात झाली आहे.
पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांचा ‘अवामी लीग’ पक्ष विसर्जित झाला असून या निवडणुकीत तो रिंगणात नाही. मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारने गेल्या वर्षी ‘अवामी लीग’वर बंदी घालून त्यांना निवडणूक लढवण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे या निवडणुकीत ‘बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी’ (बीएनपी) आणि त्यांचा एकेकाळचा मित्रपक्ष ‘जमात-ए-इस्लामी’ यांच्यातच थेट लढत झाली. देशभरातील २९९ मतदारसंघांमधील ४२,७७९ मतदान केंद्रांवर सुमारे १२ कोटी ७० लाख नोंदणीकृत मतदार होते.
बांगलादेशातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांसह मुख्य सल्लागार युनूस यांनी सकाळीच मतदान केले. ‘बीएनपी’चे अध्यक्ष तारिक रहमान यांनी ढाक्यातील गुलशन मॉडेल स्कूल केंद्रावर मतदान केले. निवडणूक मुक्त, न्याय्य आणि निष्पक्ष झाल्यास निकाल स्वीकारला जाईल, असे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, ११ पक्षांच्या युतीचे नेतृत्व करणारे ‘जमात-ए-इस्लामी’चे प्रमुख शफीकुर रहमान यांनीही पारदर्शक प्रक्रिया झाल्यास निकालाचे स्वागत करू, असे स्पष्ट केले.
बॉम्बहल्ल्यात चौघे जखमी
गोपाळगंज येथील एका मतदान केंद्रावर झालेल्या हातबॉम्ब हल्ल्यात १३ वर्षीय मुलीसह तीन जण जखमी झाले. तर मुन्शीगंज-३ मतदारसंघात मतदान केंद्राबाहेर १० ते १२ क्रूड बॉम्बचा स्फोट झाल्याने काही काळ मतदान थांबवावे लागले. एका मतदान केंद्राबाहेर ‘जमात-ए-इस्लामी’च्या कार्यकर्त्यांशी झालेल्या वादात ‘बीएनपी’ नेत्याचा मृत्यू झाला.
सुधारणा आराखड्याला होकार धोकादायक?
ढाका : मुहम्मद युनूस यांच्या अंतरिम सरकारद्वारे ८४ कलमी सुधारणा आराखड्याला सार्वजनिक संमती देण्यासाठी सार्वत्रिक जनमत घेण्यात येत आहे. परंतु बहुतांश मतदार या ८४ कलमी सुधारणा आराखड्याबद्दल अनभिज्ञ आहेत, जर हा प्रस्ताव मंजूर झाला, तर बांगलादेशचे गेल्या ५५ वर्षांचे घटनात्मक सातत्य अक्षरशः संपुष्टात येईल, असा इशारा राजकीय विश्लेषक आणि नाटककार इराज अहमद यांनी दिला.
ही जनमत चाचणी आणि घटनात्मक सुधारणा बांगलादेशचा पायाभूत इतिहास आणि कायदेशीर वारसा धोक्यात आणत आहेत, ज्यामुळे १९७१च्या स्वातंत्र्यलढ्याचा कायदेशीर आधारच कमकुवत होत असल्याचे प्रसिद्ध वकील आणि घटनातज्ज्ञ तान्या अमीर म्हणाल्या. ‘१९७२ चे संविधान हा बांगलादेशचा कायदेशीर कणा आहे. ते रद्द करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे एक राष्ट्र म्हणून बांगलादेशच्या कायदेशीर अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणे होय, असे नामवंत कायदेतज्ज्ञ स्वाधीन मलिक यांनी म्हटले.

