वृत्तसंस्था, ढाका

बांगलादेशचे आणि बांगलादेशी जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून देशाचे परराष्ट्र धोरण आखले जाईल, असे ‘बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी’ (बीएनपी) अध्यक्ष तारिक रहमान यांनी शनिवारी सांगितले. गुरुवारी झालेल्या १३व्या ‘जातीय संसद’ (पार्लमेंट) निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतर रहमान यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली. त्यावेळी त्यांना भारताबरोबरच्या संबंधांबाबत प्रश्न विचारला असता, त्यांनी वरीलप्रमाणे उत्तर दिले.

बांगलादेश निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या राजपत्रानुसार, ‘बीएनपी’ने जातीय संसदेच्या ३०० जागांपैकी २०९ जागांवर विजय मिळवला आहे. या विजयाबाबत बोलताना रहमान म्हणाले की, “हा विजय बांगलादेशचा आहे, लोकशाहीचा आहे. ज्या जनतेने लोकशाहीची आकांक्षा बाळगली आणि त्यासाठी त्याग केला, त्या जनतेचा हा विजय आहे.” निकालानंतर देशात सत्तांतर होताना जनतेने सतर्क राहावे असे आवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले. बांगलादेशची अर्थव्यवस्था रूळावर आणणे, कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सुधारणे आणि सुशासन ही आगामी सरकारसमोरील प्रमुख आव्हाने असतील, असे रहमान यांनी यावेळी स्पष्ट केले.

विचारसरणीने पाकिस्तानशी जवळीक साधणाऱ्या जमात-ए-इस्लामीला ६८ जागांवर विजय मिळाला. शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगला यंदा निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात आली होती.

परराष्ट्र धोरणाबद्दल आमची भूमिका स्पष्ट आहे, त्यामध्ये बांगलादेश आणि बांगलादेशी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले जाईल. देश आणि जनतेच्या हितांचे संरक्षण करून आम्ही आमचे परराष्ट्र धोरण ठरवू. – तारिक रहमान, अध्यक्ष, ‘बीएनपी’

रहमान यांचे मुद्दे

– देशातील लोकशाही संस्थांच्या पुनर्बांधणीसाठी सरकार आणि विरोधकांनी एकत्र काम करणे आवश्यक

– भिन्न विचारसरणी असल्या तरी राजकीय पक्षांना ऐक्य राखण्याचे आवाहन

– देशात पुन्हा हुकूमशाही प्रस्थापित होणार नाही याची खबरदारी घेणार

– बांगलादेश इतर कोणत्याही देशाच्या तंत्राने चालणार नाही

अवामी लीगवरील बंदीचे काय?

नवी दिल्ली : बांगलादेशचे नवे पंतप्रधान अवामी लीगवरील बंदी उठवण्याची शक्यता आहे, असे मत भारताच्या बांगलादेशातील माजी उच्चायुक्त वीणा सिक्री यांनी व्यक्त केले. त्याचवेळी, ‘बीएनपी’ला विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या पाहिजेत, असे सिक्री म्हणाल्या. दुसरीकडे, अवामी लीगच्या अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी या निवडणुकीच्या वैधतेला औपचारिकरित्या आव्हान दिले आहे. या निवडणुका देशाच्या लोकशाहीतील ‘लज्जास्पद अध्याय’ असल्याची टिप्पणी हसीना यांनी केली आहे.