PM Narendra Modi on Bangladesh Election Results 2026 : बांगलादेशात काल झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीला अभूतपूर्व यश मिळालं आहे. त्यामुळे या पक्षाचे अध्यक्ष तारिक रहमान यांचा पंतप्रधान पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. ते बांगलादेशचे पुढचे पंतप्रधान असतील. दरम्यान, या विजयावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स पोस्ट करून त्यांचं अभिनंदन केलंय.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

“बांगलादेशातील संसदीय निवडणुकीत बीएनपीला निर्णायक विजय मिळवून दिल्याबद्दल मी तारिक रहमान यांचे हार्दिक अभिनंदन करतो. हा विजय बांगलादेशातील जनतेचा तुमच्या नेतृत्वावरील विश्वास दर्शवितो,” असे पंतप्रधान म्हणाले. “भारत लोकशाही, प्रगतीशील आणि समावेशक बांगलादेशच्या समर्थनात उभा राहील. आमचे बहुआयामी संबंध मजबूत करण्यासाठी आणि आमची समान विकास उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे”, असंही मोदी म्हणाले.

संसदीय निवडणुकीत बीएनपीने बहुमत मिळाले आहे. माध्यमांच्या आकडेवारीनुसार या पक्षाने सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १५१ जागांचा आकडा ओलांडला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने अद्याप अंतिम निकालांची औपचारिक घोषणा केलेली नाही. बीएनपीच्या मीडिया सेलने एक्सवरील एका निवेदनात म्हटले आहे की, बहुमताच्या जागा जिंकल्यानंतर पक्ष पुढील सरकार स्थापन करण्यास सज्ज आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये अवामी लीग राजवटीच्या पतनानंतर १८ महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारणाऱ्या मुहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम प्रशासनाच्या जागी नवीन सरकार निवडण्यासाठी ही निवडणूक घेण्यात आली. त्यानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष बरखास्त करण्यात आला. या निवडणुकीत कधीकाळी मित्रपक्ष असेलेले बीएनपी आणि जमात या या दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत एकमेकांविरोधात निवडणूक लढवली.

बांगलादेशचे भारताबरोबर संबंध कसे?

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झियांच्या अंत्यसंस्कारासाठी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर डिसेंबरमध्ये ढाक्याला गेले, तेव्हा त्यांनी तारिक रहमान यांची भेट घेतली होती. तारिक यांनी मध्यममार्गी भूमिका घेताना भारताशी व्यवहारवादी मैत्रीचे धोरण स्वीकारणार असल्याचे जाहीर केले आहे. पण शेख हसीना या बांगलादेशच्या गुन्हेगार असल्यामुळे त्यांची बांगलादेशात पाठवणी करावी या त्यांच्या विनंतीवर भारताची अडचण होण्याची शक्यताही आहेच.